Sanjay Raut: सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस जबाबदार, ते स्वत:ला गृहमंत्री समजतात; संजय राऊतांचा हल्लाबोल
Parbhani violence: महाराष्ट्रात संविधानविरोधी सरकार का आलं, संविधान रक्षकांचे बळी का जात आहेत, याचा विचार करण्याची गरज आली, असे संजय राऊतांनी म्हटले.
नवी दिल्ली: परभणी हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाच्या मृत्यूला देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत. ते स्वत:ला गृहमंत्री समजतात, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. सोमनाथ सूर्यवंशी भीमसैनिकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. ते सोमवारी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी संजय राऊत यांनी परभणीच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली. ते सोमवारी राज्यसभेत हा मुद्दा मांडणार आहेत. तत्पूर्वी सोमनाथ सूर्यवंशीबाबत राऊतांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. त्याच्या लढाईचा मार्ग चुकीचा असला परभणीच्या चौकात संविधानाच्या पुस्तकावर हल्ला झाला. संविधान वाचवण्यासाठी संघर्ष केला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर मृत्यू झाला आहे. याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे, ते स्वतला गृहमंत्री समजतात. अशा या तरुण कार्यकर्त्याच्या मृत्यूवरून आंबेडकरी कार्य़कर्ते होणे स्वाभाविक आहेत. पण त्यांनी शांतता बाळगली पाहिजे. महाराष्ट्रात संविधानविरोधी सरकार का आलं त्याच्यामुळे संविधान रक्षकांचे बळी का जात आहेत, याचा विचार करण्याची आता गरज आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
सोमनाथ सूर्यवंशीच्या शवविच्छेदनाला सुरुवात
छत्रपती संभाजीनगरमध्ये मृत सोमनाथ सूर्यवंशीचे इन कॅमेरा मृतदेह शवविच्छेदन सुरु करण्यात आले आहे. न्यायालयीन समितीच्या देखरेखीखाली हे शवविच्छेदन होत आहे. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात इन कॅमेरा शवविच्छेदन सुरु आहे. नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण होणार होती. पण आंबेडकरी नेत्यांनी केलेल्या विरोधानंतर प्रशासनाने आता सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृतदेह संभाजीनगरमध्ये पाठवला होता.
नेमके काय आहे प्रकरण?
परभणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना करण्यात आल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद मध्ये शांततेत आंदोलन सुरू असताना काही समाजकंटकांनी येऊन हिंसा केली. या हिंसाचारानंतर पोलिसांनी धडपकड सुरू केली होती. यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांनाही पकडण्यात आले होते. त्यांच्यावर नवा मोडापोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यासह 27 जणांना न्यायालयाने पहिल्यांदा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती, त्यानंतर परत न्यायालयाने दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याच न्यायालयीन कोठडी दरम्यान रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूनंतर पुन्हा एकदा परभणी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या मृत्यूला दोषी असणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी पोलिसांवर कारवाई करावी या मागणीसाठी सोमवारी परभणी बंद आहे तसेच धरणे आंदोलनही केले जाणार आहे.
परभणीतील परिस्थिती पूर्वपदावर येईल: मेघना बोर्डीकर
मंत्री झाल्यानंतर आज मी विधानभावनात प्रवेश करत आहे. महायुती सरकारने जे निर्णय घेतले ते पुढे घेऊन जाईल. परभणीतीली घटना दुर्दैवी आहे. पण आरोपीला तेव्हा तात्काळ अटक केलेली होती. सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला. पोलीस विषय योग्य प्रकारे हाताळत आहेत. आज परभणी बंद आहे. हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येईल, असा विश्वास मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केला.
आणखी वाचा