Sanjay Raut : राम-कृष्णही अवतारकार्य संपल्यावर गेले होते, नरेंद्र मोदींनाही जावं लागेल; संजय राऊतांनी RSS चा नियम सांगत दिले महत्त्वाचे संकेत
Sanjay Raut on Narendra Modi : नरेंद्र मोदींचं अवतारकार्य संपलं आहे. सप्टेंबरमध्ये वयाची 75 वर्षे पूर्ण झाल्यावर पंतप्रधानपदावरुन जावं लागेल, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

Sanjay Raut on Narendra Modi : नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल, असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो. ही सगळी मुघल संस्कृती आहे, त्यामुळे आता कोणाचाही, कुठेही उत्तराधिकारी निवडण्याची वेळही आलेली नाही, असा पलटवार केला होता. आता खासदार संजय राऊत यांनी राम-कृष्णही अवतारकार्य संपल्यावर गेले होते, नरेंद्र मोदींनाही जावं लागेल, असे म्हणत आरएसएस (RSS) नियम सांगून महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
संजय राऊत म्हणाले की, स्वतः नरेंद्र मोदी यांनी एक नियम केला आहे की, त्यांच्या पक्षात 75 वर्ष झाले की सत्तेच्या पदावर कोणीही राहू नये. तो लाल कृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांना लागू केला आहे. मग या नियमाच्या पलीकडे नरेंद्र मोदी आहेत का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्या नियमाची मान्यता होती. त्यासाठी ते चर्चा करण्यासाठी गेले. 17 सप्टेंबरला नरेंद्र मोदी हे 75 वर्ष पूर्ण करत आहेत. त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना निवृत्त व्हावे लागत आहे. हे देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीत, त्यांनी कितीही बोलू द्या आणि त्यांनी जे सांगितले आहे की, बाप जिवंत असताना वारसदार ठरवला जात नाही, मुघली संस्कृती आहे, कोण बाप? मोदी हे पंतप्रधान आहेत. एक तात्पुरती व्यवस्था असते. राम आणि कृष्ण आले आणि त्यांचे अवतारकार्य संपल्यावर गेले. त्यांनी जे काय कार्य हातात घेतले होते ते संपल्यावर ते निघून गेले. नरेंद्र मोदी यांचे सुद्धा अवतारकार्य संपले आहे, त्यांना सुद्धा निघून जावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.
लालकृष्ण अडवाणींना शहाजहानप्रमाणे बेदखल केले
संजय राऊत पुढे म्हणाले की, आता देवेंद्र फडणवीस यांची गोष्ट राहिली ती म्हणजे बाप जिवंत असताना.... लालकृष्ण अडवाणी जिवंत असताना सुद्धा त्यांना शहाजहानप्रमाणे कोंडून ठेवले, बेदखल केले आणि मोदी पंतप्रधान झालेच ना. भारतीय जनता पक्षाचा डौलारा लालकृष्ण आडवाणी यांनी उभा केला. आजचा भारतीय जनता पक्ष आहे. वैभवशाली भारतीय जनता पक्ष आहे. दोन जागांपासून सत्तेच्या शिखरावर नेण्याचे काम लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या संघर्षमय नेत्यांनी केले. अयोध्येचे अख्खे आंदोलन जे राम, राम, राम आता करत आहेत, राम ते राष्ट्रमधला राजकारणात आलेला जो राम आहे, तो लालकृष्ण अडवाणी यांच्यामुळे आला आहे. म्हणून या देशातली जनता राममय झाली. त्यांचा पंतप्रधान पदाचा हक्क असताना शहाजहान प्रमाणे मुघल संस्कृतीप्रमाणे त्यांना एक प्रकारे सत्तेवरून बंदीवान आणि बेदखल केले आणि हे स्वतः झाले तेव्हा आम्ही विचारले का मुघल संस्कृती आहे म्हणून? तेव्हा देवेंद्रजींना विचारले का? हे राजकारण आहे तुम्ही राजकारण केले, असे प्रत्युत्तर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
आणखी वाचा























