Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे सीएम नको म्हणून 'तेव्हा' फडणवीस, महाजनांसह भाजप वरिष्ठ नेत्यांचा विरोध; संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा
फक्त पैशाचा व्यवहार आणि व्यापार करणे हे नेतृत्व नाही ही भाजपची भूमिका होती. हे सगळं महाविकास आघाडी स्थापन होण्यापूर्वीची गोष्ट असल्याचे संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : महाराष्ट्रामध्ये 2019 मध्ये शिवसेना आणि भाजप महायुतीचा काडीमोड आणि महाविकास आघाडीचा उदय यावरुन राजकीय आरोप प्रत्यारोपांचा खेळ अजूनही सुरूच आहे. आज (19 मे) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सर्वांत मोठा दावा करताना मुख्यमंत्री करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना 2019 मध्ये भाजपकडून आणि नंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर राष्ट्रवादीकडून विरोध होता, असं म्हटलं आहे.
शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास 2019 मध्ये देवेंद्र फडणीस, गिरीश महाजन यांच्यासह भाजपमधील वरिष्ठ नेत्यांचा विरोध होता, असं राऊत यांनी म्हटलं आहे. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्रीपदावरून वाद सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीमधून होईल, असं भाजप नेत्यांकडून सांगण्यात आलं होतं, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये काडीमोड झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन करतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यास पहिल्यांदा अजित पवार, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटील यांनी विरोध केला होता, असेही संजय राऊत म्हणाले. आम्ही सिनिअर असल्याने ज्युनिअर माणसाकडे काम करणार नाही असे त्यांनी म्हटल्याचं संजय राऊत यांनी सांगितले. मात्र, शिवसेनेकडून शिंदे यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आल्याने कदाचित मुख्यमंत्री तेच असतील असं आमच्याकडून सांगण्यात आलं होतं असंही संजय राऊत म्हणाले.
आम्ही ज्युनिअर माणसाच्या हाताखाली काम करणार नाही
संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नको, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही हे सांगणारे सर्वात आधी सुनील तटकरे अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील होते. आम्ही सिनिअर आहोत आम्ही ज्युनिअर माणसाच्या हाताखाली काम करणार नाही, अशी भूमिका होती. भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून वाद झाला तेव्हा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी शिंदे यांची निवड झाली होते. शिवसेनेकडून त्यांचं नाव पुढे गेलं होतं. परंतु, भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला निरोप पाठवला होता.
फक्त पैशाचा व्यवहार आणि व्यापार करणे हे नेतृत्व नाही
त्यांनी सांगितले की, दिल्लीचा निर्णय काय येईल, तो आम्हाला माहिती नाही. परंतु आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून चालणार नाहीत ही भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांची तेव्हा भूमिका होती. शिंदे यांचा कामाचा अनुभव कमी होता. शिंदे यांच्या कामाची पद्धत पैसा फेको तमाशा देखो अशी असल्यामुळे अनेकांना ते आपल्या आसपास नको होते. फक्त पैशाचा व्यवहार आणि व्यापार करणे हे नेतृत्व नाही ही भाजपची भूमिका होती. हे सगळं महाविकास आघाडी स्थापन होण्यापूर्वीची गोष्ट आहे.
इतर महत्वाच्या बातम्या