Sanjay Raut Bail : संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक, त्यांच्यावरही दबावतंत्र वापरलं पण गद्दारी केली नाही : आदित्य ठाकरे
Sanjay Raut Bail : खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. "संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्यांच्यावरही दबावतंत्र वापरलं पण गद्दारी केली नाही," अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.
Sanjay Raut Bail : "संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक तर आहेतच पण बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत. त्यांच्यावरही दबावतंत्र वापरलं पण गद्दारी केली नाही. ते डरपोक नाहीत हे लोकांसमोर आलं," अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दिली. शिवसेनेचे बुलंद तोफ अशी ओळख असलेले खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. तब्बल 100 दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
संजय राऊत डरपोक नाहीत, जे डरपोक होते ते पळून गेले : आदित्य ठाकरे
संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर आदित्य ठाकरे यांना विचारलं असता ते म्हणाले की, "संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक तर आहेतच, बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत. उगाचच नाव लावून फिरत नाहीत, मुखवटे लावून फिरत नाहीत. त्यांच्यावरही दबावतंत्र वापरलं पण त्यांनी गद्दारी केली नाही. ते पळून गेले नाहीत. ते डरपोक नाहीत हे लोकांसमोर आलं आहे. जे डरपोक होते ते पळून गेले. मी आता तेच सांगितलं जे कोणी सत्तेविरोधात आवाज उठवतात, सरकारविरोधात बोललं की दबावतंत्र वापरलं जातं. आज राजकीय लोकांवर कारवाई होते, उद्या ज्यांना ते एचएमव्ही बोलतात त्यांच्यावरही कारवाई होईल ही देशासाठी धोक्याची घंटा आहे."
संजय राऊत यांना आज संध्याकाळीच तुरुंगाबाहेर येणार?
संजय राऊत तब्बल 100 दिवसांनी जामीन मिळाला आहे. पीएमएलए विशेष कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर राऊत तुरुंगाबाहेर कधी येणार, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. संजय राऊत यांच्या जामिनाला ईडीने विरोध केला असून स्थगिती देण्याची मागणी केली आहे. ईडी संजय राऊतांच्या जामिनाविरोधात हायकोर्टात अपील करणार आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राऊत आज संध्याकाळीच तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे.
संजय राऊत यांच्यावर आरोप काय?
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी 31 जुलै रोजी ईडीने अटक केली होती. त्यानंतर संजय राऊतांना सर्वात आधी ईडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात होते. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीकरुन करण्यात आला आहे. संजय राऊत यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले होते. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. याच पैशातून अलिबाग येथे जमीन खरेदी करण्यात आली होती. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती, ते प्रविण राऊत हे फक्त नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊतच आहेत, असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. तसेच, संजय राऊतच संपूर्ण घोटाळ्याचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप ईडीने केला आहे.