Sanjay Gaikwad: बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना 70-74 जागांच्या पुढेही शिवसेना जात नव्हती; संजय गायकवाड यांची ठाकरे ब्रँडवर टीका
Sanjay Gaikwad On Raj Thackeray Uddhav Thackeray: महाराष्ट्रात ज्यांना मराठी बोलण्याची लाज वाटते म्हणतो त्याचे थोबाड फोडले पाहिजे. मराठीचा अपमान आपण सहन करता कामा नये, असंही संजय गायकवाड म्हणाले.

Sanjay Gaikwad On Raj Thackeray Uddhav Thackeray: ठाकरे नावाचा ब्रँड असता बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) जिवंत असतानाच 288 जागा निवडून आले असत्या. त्यावेळीही 70-74 च्या पुढे शिवसेना जात नव्हती, असं विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भाऊ एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही. वेळ निघून गेलीय, अशी टीकाही संजय गायकवाड यांनी केली.
ठाकरे बंधूंचा मेळावा (Raj Thackeray Uddhav Thackeray Victory Rally ) काल (5 जुलै 2025) मुंबईतील एनएससीआय डोममध्ये साजरा करण्यात आला. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 19 वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र दिसले. यावर संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात कोणताच ब्रँड चालत नाही, महाराष्ट्रात फक्त विकास हाच ब्रँड चालतो. शेतकऱ्यांचं जो हित बघेल, गोरगरिबांना मदत करेल, तरुणांना रोजगाराची संधी देईल, त्यांचाच ब्रँड चालेल, असं संजय गायकवाड यांनी सांगितले. ठाकरे बंधू एकत्र आल्याने त्यांना शुभेच्छा आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांनाही जमलं नाही. मात्र आज ते दोघं एकत्र आले. त्यामुळे दोघांनाही माझ्या शुभेच्छा आहेत, असं संजय गायकवाड म्हणाले.
मराठीचा अपमान आपण सहन करता कामा नये- संजय गायकवाड
आपण परराज्यात गेल्यावर तिथे मराठीत आपण बोलणार का, असा सवाल उपस्थित करून जगात टीकायचे असेल तर सगळ्या भाषा अवगत असल्या पाहिजेत, असेही संजय गायकवाड म्हणाले. पाकिस्तानचा दहशतवाद ओळखायचा रोखायचा असेल तर आपणाला उर्दू भाषा ही अवगत असली पाहिजे अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली. दरम्यान, ज्यांना महाराष्ट्रात मराठी बोलण्याची लाज वाटते म्हणतो त्याचे थोबाड फोडले पाहिजे. मराठीचा अपमान आपण सहन करता कामा नये, असंही संजय गायकवाड म्हणाले.
ठाकरे बंधूंना ओपन चॅलेंज-
महाराष्ट्रात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलंय...अशातच भोजपुरी अभिनेते आणि भाजपचे माजी खासदार निरहुआनं वादग्रस्त वक्तव्य केलंय. 'आपण मराठी बोलत नाही, हिंमत असेल तर महाराष्ट्रातून काढून दाखवा' असं थेट चॅलेंज त्यांनी दिलंय. त्यामुळे आता हा मुद्दा पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. तुम्ही गरिबांना का लक्ष्य करता? प्रत्यक्षात हिंदीला विरोध करणारे लोक हे फुटीरतेचं राजकारण करत असल्याचं निरहुआ म्हणालेत. आता यावर मनसे आणि ठाकरेंची शिवसेना काय भूमिका घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
























