Sangli Loksabha: विशाल पाटलांसाठी सत्यजित तांबे मैदानात उतरले, वसंतदादांचा वारसा सांगत म्हणाले...
Maharashtra Politics: अपक्ष उमेदवार अर्ज भरल्यामुळे निलंबनाची कारवाई झालेले सत्यजित तांबे हे आता विशाल पाटील यांच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. त्यांनी सांगलीवर विशाल पाटलांचा दावा कसा योग्य आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
सांगली: लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येऊन ठेपली तरी सांगली लोकसभेच्या जागेवरुन महाविकास आघाडीत निर्माण झालेला तिढा अद्याप सुटलेला नाही. विशाल पाटील (Vishal Patil) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांच्याविरोधात बंडखोरी करण्याचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत एकीकडे ठाकरे गटाचे नेते काँग्रेसनेच विशाल पाटलांची समजूत काढावी, असे सांगत आहेत. परंतु, दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे नेते विशाल पाटलांचा दावा योग्य आहे, अशा धाटणीची वक्तव्यं करुन त्यांच्या नाराजीला आणखी खतपाणीच घालत आहेत. या सगळ्या घडामोडी सुरु असताना आता काँग्रेसचा माजी तरुण नेता विशाल पाटलांच्या बाजूने रिंगणात उतरला आहे. हा नेता म्हणजे दुसरा-तिसरा कोणी नसून सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) आहेत.
सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी पक्षाच्या आदेशाविरोधात जात अपक्ष उमेदवार अर्ज भरला होता. त्यामुळे सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली होती. या निवडणुकीत सत्यजित तांबे निवडून आले होते आणि त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लागली होती. त्यानंतर सत्यजित तांबे महाराष्ट्राच्या राजकारणात फारसे चर्चेत नव्हते. मात्र, आता सत्यजित तांबे यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा देत पु्न्हा एकदा काँग्रस नेतृत्त्वाविरोधात शड्डू ठोकला आहे. सत्यजित तांबे हे महाराष्ट्रातील आश्वासक तरुण नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे सत्यजित तांबे यांनी विशाल पाटील यांना दिलेला पाठिंबा सांगलीत मविआच्या चंद्रहार पाटील यांच्याविरोधात वातावरणनिर्मिती करणारा ठरु शकतो.
Vishal Dada,
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) April 16, 2024
All the best !
विशाल पाटलांवर काय अन्याय झालाय, हे फक्त त्यांचा संघर्ष माहित असलेल्यांनाच ठाऊक आहे. त्यांना हे पाऊल का उचलावे लागले ह्याचा विचार होणे गरजेचे आहे.
राजकारणात कर्तृत्ववान युवक हवेत ह्या मताचा मी कार्यकर्ता आहे.
वसंतदादा पाटलांचे ह्या महाराष्ट्रावर… https://t.co/wRIiaJtQMt
सत्यजित तांबे यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं?
सत्यजित तांबे यांनी आपल्या एक्स हँडलवर विशाल पाटील यांचा एक व्हीडिओ शेअर केला आहे. या ट्विटमध्ये सत्यजीत यांनी विशाल पाटील यांची बाजू मांडताना म्हटले आहे की, विशाल पाटलांवर काय अन्याय झालाय, हे फक्त त्यांचा संघर्ष माहित असलेल्यांनाच ठाऊक आहे. त्यांना हे पाऊल का उचलावे लागले ह्याचा विचार होणे गरजेचे आहे. राजकारणात कर्तृत्ववान युवक हवेत ह्या मताचा मी कार्यकर्ता आहे. वसंतदादा पाटलांचे ह्या महाराष्ट्रावर व आमच्या पिढीवर अनंत उपकार आहेत, विशेषतः त्यांनी केलेल्या शिक्षणाच्या क्रांतीमुळेच आज घराघरात डॉक्टर, इंजीनियर तयार होत आहेत. विशालदादा हे वसंतदादांचा कामाचा वसा व वारसा पुढे घेऊन जाण्यात पूर्णपणे सक्षम आहेत. त्यामुळेच त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, विशालदादांना कुठेतरी संधी मिळायलाच हवी, असे सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
मोठी बातमी : विशाल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, सांगली लोकसभा लढणारच!