Sandeep Deshpande on Shiv Sena MNS Alliance: शरद पवारांसोबत जाताना कार्यकर्त्यांना विचारलं का? दबावाचे राजकारण करू नका; संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंना सुनावले
Sandeep Deshpande on Shiv Sena MNS Alliance: काल जो उत्साह दिसला तो 19 वर्षात कधीच दिसला नाही. अचानक उत्साह का वाटायला लागला? असा सवाल देखील संदीप देशपांडे यांनी उपस्थित केलाय.

Sandeep Deshpande on Shiv Sena MNS Alliance: गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी मनसे सोबतच्या युतीबाबत भाष्य केले. राज्याच्या मनात आहे, तेच मी करणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, मनसेसोबत युतीसाठी आपण सकारात्मक आहोत. मात्र स्थानिक पातळीवर युती, आघाडी संदर्भात आढावा घेऊन माहिती द्या, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांच्या बैठकीत दिल्या. आता यावरून मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय.
संदीप देशपांडे म्हणाले की, 2019 साली ते जेव्हा महाविकास आघाडीत गेले. तेव्हा असा सर्वे त्यांनी केला असता तर कदाचित आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते. आज एकच शिवसेना असती. म्हणून कदाचित हे शहाणपण सुचलं असेल. मुळात राज्यात भरपूर विषय आहेत. त्यावर आवाज उठवणे आवश्यक आहे. मला असे वाटते की, युतीमध्येच काही लोक अडकले आहेत. आम्ही युतीच्या बाहेरच्या महाराष्ट्राचा विचार करत आहोत. सध्या आम्ही कोणासोबत युती करणार किंवा कोणासोबत आघाडी करणार, यापेक्षा महत्त्वाचा विषय म्हणजे राज्यातील हिंदी सक्तीच्या विषयाला विरोध करणे आहे. त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत, असे त्यांनी म्हटले.
अचानक उत्साह का वाटायला लागला?
संदीप देशपांडे म्हणाले की, आम्हाला आता महाराष्ट्र राज्य, मराठी भाषा हे जास्त महत्त्वाचे आहे. आमचा त्यादृष्टीने विचार सुरू आहे. काल जो उत्साह दिसला तो 19 वर्षात कधीच दिसला नाही. अचानक उत्साह का वाटायला लागला? अचानक बॅनर का लागायला लागले? हेच संजय राऊत चार महिन्यांपूर्वी आम्हाला बोलले होते की, बाळासाहेबांचा फोटो का लावत आहात? अचानक सगळे सकारात्मक झाले याला कारण काय? असे सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केले.
दबावाचे राजकारण करू नका
आज त्यांचे 20 आमदार आले आहेत. हे जर 60 आमदार आले असते तर शिवसैनिक इतके सकारात्मक तरी दिसले असते का? 2017 साली आम्ही प्रस्ताव दिला, तेव्हा शिवसैनिक सकारात्मक नव्हते. 2014 साली आम्ही प्रस्ताव दिला त्यावेळेस त्यांचे शिवसैनिक सकारात्मक नव्हते. तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये का उत्साह नव्हता? मी समजू शकतो की, तुमच्यावर वाईट वेळ आली आहे. तुम्ही विचार करताय की स्वतःचा पक्ष आपण कसा पुढे न्यावा, त्यासाठी तुमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात काही गैर आहे, असे मला म्हणायचे नाही. पण, त्याचा अर्थ तुम्ही आमच्यावर दबाव आणू शकत नाही. ज्यावेळी त्याचा निर्णय घ्यायचा त्यावेळी राज ठाकरे घेतील. तुम्ही आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला दिला. तर शरद पवारांसोबत जाण्याबाबत कार्यकर्त्यांना विचारलं का? काँग्रेस सोबत जाऊ का, यासाठी बैठका घेतल्या का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
आणखी वाचा
























