सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही, पण अजितदादांविरोधात बोलत राहील, रोहित पवारांनी शड्डू ठोकला
Sunetra pawar vs Supriya Sule : बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार उमेदवार देणार यावर शिक्कमोर्तब झालं. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार (Sunetra vs Supriya Sule) मैदानात उतरणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय.
Baramati Lok Sabha constituency : बारामती म्हटलं की पवार अन् पवार म्हटलं की बारामती... हे समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात (maharashtra politics) रुजलेलं आहे. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP crisis) फूट पडली. अजित पवार यांनी शरद पवारांपासून दूर जायचा निर्णय घेतला. महायुतीत दाखल झाल्यानंतर अजित पवारांनी बारामती मतदारसंघावर दावा ठोकलाय. नुकत्याच बारामतीमधील सभेत अजित पवार यांनी मी दिलेला उमेदवार निवडून द्या, अशी भावनिक साद दिली. त्यामुळे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार उमेदवार देणार यावर शिक्कमोर्तब झालं. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार (Sunetra vs Supriya Sule) मैदानात उतरणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. नणंद भावजय असा सामना बारामतीमध्ये रंगण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील लढतीबाबत रोहित पवार यांना विचारण्यात आलं. सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही, पण अजितदादांविरोधात बोलत राहील, असे त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.
सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही, पण.... रोहित पवार
आंबेगावमध्ये शरद पवार कार्यकर्त्यांन संबोधित करणार आहेत. त्या सभेला रोहित पवारही उपस्थित राहणार आहेत. त्याआधी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं. त्याशिवाय बारामतीमध्ये काकी विरुद्ध आत्या अशी लढत झाली तर सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही, असेही सांगितलं. रोहित पवार म्हणाले की, बारामती लोकसभेत सुनेत्रा काकींविरुद्ध आत्या अशी लढत झालीच. तर आम्ही सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही. कारण त्या आतापर्यंत राजकारणात नव्हत्या. त्यांनी केवळ समाजसेवा केली. त्यामुळं बारामतीत खरी लढत ही सुप्रिया ताई विरुद्ध अजित दादा अशी होणार आहे, म्हणून अजित दादांविरोधात बोलू, असे रोहित पवार म्हणाले.
रोहित पवारांचा अजित पवारांना टोला -
अजित दादा सध्या कुटुंबात एकटे आहेत, असं चित्र आहे. पण ते सध्या ते स्वतःसाठी आणि मलिदा गॅंग साठी बोलतात, असा टोलाही यावेळी रोहित पवार यांनी लगावला. त्याशिवाय युगेंद्र पवार म्हणत असतील 'शरद पवार साहेब तसं', म्हणजे याचं स्वागत करायला हवं. आमच्या सारख्या बच्चाला हे कळतंय, साहेबांना साथ देण्याची गरज आहे, असे म्हणत अजित पवारांना टोला लगावला.
पार्थ पवार शिरुरमध्ये लढणार ?
प्रसार माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, "मी पुन्हा येईन नंतर आता अमोल कोल्हे यांना पाडणार असं अजित पवार म्हणतात. आता अमोल कोल्हे यांच्याविरोधात पार्थ पवार ही असू शकतात. मात्र अजित दादांना महायुतीत चार जागा मिळतील, पण त्यात शिरूर लोकसभा मिळायची नाही. " दरम्यान, महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील शुरुर आणि बारामती मतदारसंघावर दावा केला होता, तो दावा आजही कायम आहे. पुढील काही दिवसांत महायुतीमध्ये जागावटपाची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर कुणाला किती जागा याबाबत समोर येईल.