Riteish Deshmukh : काका आणि पुतण्याचं नातं कसं असायला पाहिजे, रितेश देशमुखचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला
Riteish Deshmukh on Ajit Pawar and Sharad Pawar : काका आणि पुतण्याचं नातं कसं असायला पाहिजे, असं म्हणत रितेश देशमुखने अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला मारला आहे.
Riteish Deshmukh News : लातूरमध्ये विलासराव सहकार कारखान्यात विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचं अनावरण पार पडलं, या कार्यक्रमात अभिनेता रितेश देशमुख उपस्थित होता. यावेळी रितेश देखमुखने वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. यासोबत रितेश देशमुखने राजकीय टोलेबाजीही केली आहे. काका आणि पुतण्याचं नातं कसं असायला पाहिजे, असं म्हणत रितेश देशमुखने अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला मारला आहे.
राजकारणात पातळी घसरली : रितेश देशमुख
रितेश देशमुखमने म्हटलं की, आजकाल राजकारणामध्ये कुठल्या-कुठल्या पातळीला भाषण जातात हे पाहून दु:ख होतं, जो महाराष्ट्र एकेकाळी दिग्गज नेते त्याच्या भाषणांना गाजवला, तो काळ आता दिसत नाही. भावा-भावांचं प्रेम विलासराव साहेब आणि दिलीपराव साहेबांनी शिकवलं. काका आणि पुतण्यामधील प्रेम कसं असावं याचं हे उत्तम उदाहरण आहे, असंही रितेशने म्हटलं आहे.
काका-पुतण्याचं नातं कसं असावं?
आज साहेबांना जाऊन जवळपास 12 वर्ष झाली. थोडी फार उणीव नेहमीच भासते, पण ही उणीव आपल्याला कधी भासू नये म्हणून काका नेहमी मागे उभे राहिले. याच्यासाठी उभे राहिले की, आपल्या मुलाला गरज असली तरी मी आहे आणि नसली तरीही मी आहे. काकांना बऱ्याच वेळेस बोलता आलं नाही. पण, आज मी सर्वांसमोर सांगतो, काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो, असं म्हणत रितेशने दिलीपरावांसमोर आपल्या भावना आणि प्रेम व्यक्त केलं. काका आणि पुतण्याचं प्रेम कसं असलं पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण आज या स्टेजवर आहे, असंही रितेश देशमुख यांनी यावेळी म्हटलं.
गांधी, पवार, ठाकरे यांच्याकडे सामान्यांना अपेक्षा : अमित देशमुख
अमित देशमुख यांनी यावेळी भाषणात म्हटलं की, विलासराव देशमुख यांचे नाव आठवलं तर निष्ठा हे समीकरण कायम आहे. ''मला तुम्ही काँग्रेसमधून काढून टाकलं तरी माझ्या रक्तातील काँग्रेस कशी काढणार'', हे विलासराव देशमुख म्हणायचे. मला ही विचारात आहेत, मात्र मी जेथे आहे, तेथे ठीक आहे. समाजाची नाळ तोडून इकडे-तिकडे जाणं अपेक्षित नाही. सामान्य माणसाचा विश्वास संपादन करून सर्व जुन्या नेत्याचे दिवस पुन्हा आणू या. त्यासाठी सर्व सामान्य पर्यंत हे विचार पुन्हा पोहचविणे आवश्यक आहे.'' गांधी, पवार, ठाकरे यांच्याकडून सामान्य माणूस पाहात आहेत, त्यांच्याकडून जनतेला अपेक्षा आहेत. त्याची जबाबदारी आता येथील नेत्यावर आहे, असंही अमित देशमुख यांनी म्हटलं आहे.