Gajanan Kirtikar: अमोल जिंकला तर वडील म्हणून आनंद; वायकर जिंकला काय अन् हरला काय, माझा काय दोष: गजानन कीर्तिकर
Maharashtra Politics: गजानन कीर्तिकर यांचं आणखी एक वक्तव्य. शिशिर शिंदेंची गजाभाऊंवर टीका, गजानन कीर्तिकर यांना मातोश्रीवर जाऊन लोटांगण घालण्याची घाई झाली आहे, असे शिशिर शिंदे यांनी म्हटले होते.
मुंबई: उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने मी कुटुंबात एकटा पडलो, असे वक्तव्य ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. तर शिंदे गटाच्याच शिशिर शिंदे (Shishir Shinde) यांनी गजानन कीर्तिकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर गजानन कीर्तिकर यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधताना आपली बाजू मांडली.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात एका वृत्तवाहिनीने माझी मुलाखत घेतली. गेले 20 दिवस तुमचा पाठिंबा कोणाला,असा प्रश्न मला विचारण्यात आला. रवींद्र वायकर यांच्या पूर्वतयारीसाठी जेवढ्या सभा झाल्या त्या सर्वांना मी उपस्थित होतो. कोल्हापूर आणि नाशिकमध्ये जाऊन प्रचारही केला. तरीही काही गोष्टींचा विपर्यास करण्यात आला. याचा मला त्रास होतो. असा प्रसंग कोणाच्याही जीवनात येऊ नये. माझ्या पत्नीने सांगितली ती गोष्ट खरी आहे, तिने तिचे मत मांडले, असे गजानन कीर्तिकर यांनी म्हटले.
मी एकनाथ शिंदेंना शेवटपर्यंत साथ देईन, शिशिर शिंदे सेन्सेटिव्ह: गजानन कीर्तिकर
एकनाथ शिंदे यांनी उठाव केला आणि शिवसेनेचे विचार घेऊन पुढे जात आहेत. आमचा पक्ष कुठेतरी भरकटत होता म्हणून मी एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलो. एकनाथ शिंदे यांच्यापाठी शिवसेनेचे बळ उभे राहील. शिशिर शिंदे यांनी माझी पक्षातून हकालपट्टी करण्याचे पत्र लिहले. शिशिर शिंदेंनी त्यांची भावना मांडली. तो एक ध्येयवादी शिवसैनिक आहे, तसाच तो सेन्सेटिव्ह देखील आहे. मी आमच्या उमेदवारासाठी सर्वकाही केले. एकनाथ शिंदे एक उद्दिष्ट घेऊन आलेले आहेत. एकनाथ शिंदे यांना मी शेवटपर्यंत साथ देईन, असे गजानन कीर्तिकर यांनी म्हटले.
वायकर जिंकला काय किंवा हरला काय, माझा काय दोष: कीर्तिकर
मी खासदार असताना आम्ही कामाची विभागणी केली होती. मला सर्व बघायला वेळ मिळत नव्हता. अमोल 9 वर्षे सर्व पाहत होता. मी 57 वर्षे शिवसेनेत आहे. माझ्या कुटुंबीयांची भावना होती की, तुम्ही शिवसेना सोडून जाऊ नका. पण एकनाथ शिंदे हा भवितव्य घडवणारा नेता आहे म्हणून मी त्यांच्याकडे गेलो. मी आता एकनाथ शिंदेंना जाऊन भेटणार आहे. वायकर जिंकला काय आणि हरला काय, यात माझा काय दोष, मतदार जे ठरवतात, ते होईल. पण अमोल जिंकला तर मला वडील म्हणून नक्कीच आनंद होईल, असे गजानन कीर्तिकर यांनी म्हटले.
आणखी वाचा