Raju Shetti : काही वेळापूर्वी स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या राजू शेट्टींचा सूर बदलला, आता म्हणतात, मविआचा पाठिंबा घेईन पण...
Maha Vikas Aghadi : आम्ही महाविकास आघाडीमध्ये येणार नाही, पण त्यांचा पाठिंबा घ्यायला तयार असल्याचं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं.
सांगली: भारतीय जनता पक्षाच्या किंवा त्यांच्या मित्रपक्षाचा पराभव व्हावा असं जर का महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांना वाटत असेल तर त्यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात (Hatkanangale Lok Sabha Election) उमेदवार उभा करू नये, मविआने मला पाठिंबा जाहीर करावा, मी पाठिंबा घ्यायला तयार आहे असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सांगितलं. आपण मविआचा पाठिंबा घेऊ पण आघाडीत येणार नाही अशी आपली ठाम भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
भाजपच्या विरोधात, पण महाविकास आघाडीमध्ये येणार नाही
आम्ही 2015 पासून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहोत. खरं तर या आधीपासूनच आम्ही भाजपचे विरोधक आहोत. त्यामुळे आम्ही भाजपसोबत जाणार नाही, या आमच्या भूमिकेवर देखील आम्ही ठाम आहोत असे शेट्टी म्हणाले. मागेच स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणीमध्ये महाविकास आघाडीसोबत असणारे सगळे संबंध तोडण्याचा निर्णय घेतला होता. स्वाभिमानीने इथून पुढे ज्या काही निवडणुका लढवायच्या आहेत स्वतंत्र लढवायच्या हा निर्णय घेतला होता.
जवळपास तीन वर्षांपूर्वी मविआचे प्रमुख शरद पवार यांना आम्ही आघाडी का सोडतोय याबाबत एक नऊ पानी पत्र लिहले होते. पण त्या पत्राची साधी दखलही मविआने घेतली नव्हती. त्यामुळे मविआ आघाडीमधून निवडणूक लढवायची नाही, तर स्वतंत्र निवडणूक लढवायची हा निर्णय आम्ही घेतला होता आणितो आजही कायम असल्याचं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं.
राजू शेट्टींच्या विरोधात मविआ उमेदवार देणार?
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाविकास आघाडीची चर्चा फिसकटल्याचं चित्र आहे. राजू शेट्टी आमच्यासोबत यावे अशी आमची इच्छा होती, मात्र त्यांचा विचार वेगळा दिसतोय असं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं. त्यामुळे हातकणंगल्यात महाविकास आगाडीकडून राजू शेट्टी यांच्या विरोधात उमेदवार देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने हे खासदार आहेत. त्यांच्या विरोधात राजू शेट्टी हे पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. ही जागा शिवसेनेकडे असल्याने महाविकास आघाडीने आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मागणी करत राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंची दोन वेळा भेट घेतली होती. आपण महाविकास आघाडीमध्ये येणार नाही, पण आपल्याला पाठिंबा द्यावा अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतलीय.
ही बातमी वाचा: