Bharat Jodo Yatra: कर्नाटकात काँग्रेसचं बहुमत स्पष्ट झालं आहे. विधानसभेच्या 224 जागा असलेल्या या राज्यात काँग्रेसला 136 जागा मिळाल्या आहेत. कर्नाटक निवडणुकीत (Karnataka Election) काँग्रेसला मिळालेल्या यशाकडे भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) सकारात्मक परिणाम म्हणून पाहिलं जात आहे. भारत जोडो यात्रेने कर्नाटकातील 20 मतदारसंघांतून आणि 51 गावांमधून प्रवास केला. त्यातील, 15 मतदारसंघांत काँग्रेसने (Congress) बाजी मारली आहे.


कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात (Karnataka Assembly Election Result) काँग्रेस पक्ष आघाडीवर असल्याची बातमी येताच काँग्रेस पक्षाने आपल्या ट्विटर हँडलवर यात्रेदरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला. भारत जोडो यात्रेच्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये "मी अजिंक्य आहे आणि मला खात्री आहे की, आज मला रोखणारं कोणी नाही" असं लिहिलं आहे.


राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेमुळेच कर्नाटकात काँग्रेसला घवघवीत यश मिळालं असल्याचं काँग्रेस पक्षाचं मत आहे. भारत जोडो यात्रेशी संबंधित व्हिडीओ शेअर करून पक्षाने यावर शिक्कामोर्तबही केले आहे.


मूळचे कर्नाटकचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी निवडणुकीतील विजय हा 'जनता जनार्दन'चा विजय, म्हणजेच जनतेचा विजय असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांना शनिवारी संध्याकाळपर्यंत बंगळुरूला पोहोचण्यास सांगण्यात आलं आहे आणि त्यानंतर सरकार स्थापनेची योग्य प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असं खर्गे म्हणाले


राहुल गांधी यांनी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) सुरुवात केली. ही यात्रा काश्मीरमध्ये संपली. काँग्रेस नेते राहुल गांधींनी कर्नाटकात 21 दिवस प्रवास केला, कर्नाटकात त्यांनी 511 किलोमीटरचा पायी प्रवास केला. 30 सप्टेंबर 2022 ते 19 ऑक्‍टोबर 2022 या काळात ते राज्यातील सात जिल्ह्यांमधून गेले, ज्यात 51 गावांचा समावेश आहे. या सात जिल्ह्यांतील 20 पैकी 15 जागा काँग्रेसने निवडून आणल्या आहेत. 




2023 च्या निवडणुकीत सत्तेत आल्यास पहिल्या कॅबिनेट बैठकीत 5 लोकोपयोगी विधेयकांना मंजुरी देऊ, अशी घोषणा काँग्रेसने केली होती. पाहूया त्या योजना...


1. गृह ज्योती - सर्व घरांना 200 युनिट मोफत वीज


2. गृहलक्ष्मी - प्रत्येक कुटुंबाच्या महिला प्रमुखाला 2,000 रुपये मासिक मदत


3. अन्न भाग्य - गरिब कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 10 किलो तांदूळ मोफत


4. युवा निधी - बेरोजगार पदवीधर तरुणांसाठी दरमहा 3,000 रुपये आणि दोन वर्षांसाठी बेरोजगार पदविकाधारकांना 1,500 रुपये


5. महिला प्रवास - सार्वजनिक वाहतूक बसमध्ये महिलांसाठी मोफत प्रवास


पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजप प्रमुख जेपी नड्डा (J P Nadda) यांच्या दौऱ्यांचा कर्नाटकच्या मतदारांवर कोणताही परिणाम झाला नाही, असं स्पष्ट मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी व्यक्त केलं आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी हा विजय महत्त्वाचा असल्याचं ते म्हणाले. तसेच, राहुल गांधींना (Rahul Gandhi) पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्यासाठी एकजुटीने लढण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं.


हेही वाचा: