PM Modi on Karnataka Elections: कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचं कौतुक केलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन आणि लोकांच्या अपेक्षा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा! असं ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला शुभेच्छा दिल्या.
कर्नाटक निवडणुकीत ज्यांनी भाजप पक्षाला पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी आभार मानतो, असेही ते म्हणाले. मी भाजप कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे कौतुक करतो, असं मोदी म्हणाले. आगामी काळात आम्ही कर्नाटकची सेवा आणखी जोमाने करू, असं ट्विट मोदींनी केलं आहे आणि भाजपलाही पुढील वाटचालीसाठी बळ दिलं आहे.
कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला आहे आणि काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटकातील या विजयाबद्दल काँग्रेसचं अभिनंदन केलं आहे. यावेळी कर्नाटकात सत्तेत आलेल्या काँग्रेसला एक सल्ला द्यायलाही ते विसरले नाहीत.
कर्नाटकात सत्ता राखण्याचं आव्हान भाजपसमोर होतं. कर्नाटकातील निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची होती, भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्येच अटीतटीची मुख्य लढत सुरू होती. बऱ्याच एक्झिट पोलनुसार कर्नाटक निवडणुकीचा अंदाज वर्तवण्यात आला होता. या पोल्सनुसार, काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल,असे संकेत मिळाले होते. तर काही पोल्सनी कर्नटकात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहिल, पण त्यांना स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असा अंदाज व्यक्त केला होता. तर काही एक्झिट पोलनुसार कर्नाटकात त्रिशंकू विधानसभा निर्माण होईल आणि जेडीएस किंग मेकर ठरेल, असे संकेतही मिळाले होते.
दक्षिणेतील एकमेव आणि मोठं राज्य असलेल्या कर्नाटकातील सत्ता टिकवण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः कर्नाटकात 20 हून अधिक जाहीर सभा घेतल्या होत्या, बरेच रोड शो केले होते. कर्नाटकात प्रचारादरम्यान बजरंग बली आणि द केरला स्टोरी चित्रपटासारखे धार्मिक आणि जातीय मुद्दे जाणीवपूर्णक भाजपने प्रचारात आणले होते. पण भाजपच्या या प्रयत्नांचा काहीही उपयोग झाला नाही आणि कर्नाटकात भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.