Karnataka Assembly Election Results:  संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत (Karnataka Assembly Election) काँग्रेसने (Congress) दणदणीत विजय मिळवला आहे. कर्नाटकमधील मतदारांनी काँग्रेसच्या पारड्यात भरभरून मतदान केल्याने आता पक्षाला स्पष्ट बहुमतासह सरकार स्थापन करता येणार आहे. पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी दक्षिणेतील महत्त्वाच्या राज्यात झालेला हा पराभव भाजपसाठी धक्का मानला जात  आहे. सायंकाळी 5.45 वाजण्याच्या सुमारास जाहीर झालेले निकाल आणि मतमोजणीतील आघाडीनुसार, काँग्रेसच्या पारड्यात 136 जागा जाताना दिसत आहे. तर, भाजपला 64 जागांवर विजय मिळाला आहे. एक्झिट पोलमध्ये किंगमेकर राहण्याची शक्यता वर्तवलेला जनता दल सेक्युलरने 20 जागांवर विजय मिळवला आहे. निवडणुकीतील या विजयानंतर देशभरात काँग्रेसने जल्लोष साजरा केला. 


कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल (Karnataka assembly election results) हे भारतीय जनता पक्षासाठी एका मोठ्या झटक्यापेक्षा कमी नसल्याचे म्हटले जात आहे. मावळत्या सरकारचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सरकारमधील अनेक मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. बी श्रीरामुलू, के सुधाकर, जेसी मधुस्वामी, गोविंद करजोल, एमटीबी नागराज जेसी नारायण गौडा आणि विधानसभा अध्यक्ष व्ही. हेगडे यांच्या नावांचा समावेश आहे. बसवराज बोम्मई यांनी शिग्गाव आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येदियुरप्पा यांचा मुलगा विजयेंद्र हे शिकारीपुरा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. 


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी भाजप नेते आणि मंत्री आर अशोक यांचा 1 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. दुसरीकडे, चित्तापूर मतदारसंघातून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक यांनी भाजपच्या मणिकांत राठोड यांचा 13,000 हून अधिक मतांनी पराभव केला.


माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांना मोठा धक्का बसला आहे. रामनगरममध्ये एचडी कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल यांचा काँग्रेसचे उमेदवार एचए इक्बाल हुसैन यांच्याकडून 10 हजार 715 मतांनी पराभव झाला आहे. 


बेळगावमध्ये काँग्रेसची मुसंडी


बेळगावला कर्नाटकच्या उपराजधानीचा दर्जा आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये 18 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये तब्बल 11 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे, तर सात जागांवर भाजपला समाधान मानावे लागले आहे. या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दुसरीकडे काँग्रेसने तब्बल अकरा जागा जिंकत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.


कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारातील मुद्यांवरून चांगलीच गाजली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्याशिवाय, बजरंग दल आणि पीएफआयवरील बंदीचे आश्वासन काँग्रेसने दिले होते. त्या मुद्यावरून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याला हिंदुत्ववादाशी जोडले आणि हनुमानाचा अपमान असल्याचे प्रचारात म्हटले. तर, काँग्रेसने स्थानिक मुद्यावर भर दिला होता. 


इतर संबंधित बातम्या: