Pune Shanivar Wada: कुणीही आपण सरकार असल्याच्या थाटात वागू नये, शनिवार वाड्याबाहेरच्या राड्यावरुन नीलम गोऱ्हेंचा मेधा कुलकर्णींना टोला
Pune Shanivar Wada: पुण्यातील शनिवार वाड्याजवळ असलेला दर्गा हटवण्यात यावा, अशी मागणी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली. नमाज पठणावरुन पुण्यातील राजकारण तापले

Pune Shanivar Wada: शनिवार वाडा ही पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली वास्तू आहे. त्याचे काही नियम आहे. या नियमांचे पालन झाले पाहिजे. शनिवार वाड्याच्या (Shanivar Wada) परिसरात पुरातत्व विभागाचे काही नियम मोडले असतील तर राज्य सरकार आहे, पोलीस आयुक्त आहेत, जिल्हाधिकारी अस्तित्वात आहेत. त्यामुळे इतर कोणीही आपण सरकार आहोत, या थाटात वागू नये, असा टोला विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी भाजप खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांना लगावला.
पुण्यातील शनिवार वाड्यात काही मुस्लीम महिलांनी नमाज पठण केल्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावरुन रविवारी शनिवार वाड्याबाहेर खासदार मेधा कुलकर्णी आणि पतित पावन संघटनेने जोरदार निदर्शन केली होती. मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्याच्या आत जाऊन नमाज पठण झालेल्या ठिकाणावर शिववंदना करण्याचा आग्रह धरला होता. तसेच आम्हाला त्याठिकाणी गोमूत्र शिंपडायचे असल्याचा हट्टही मेधा कुलकर्णी यांनी धरला होता. मात्र, पोलिसांनी त्यांना मज्जाव केल्याने मेधा कुलकर्णी प्रचंड आक्रमक झाल्या होत्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर नीलम गोऱ्हे यांनी मेधा कुलकर्णी यांना, 'आपण स्वत: सरकार आहोत, या थाटात वागू नये', असा टोला नीलम गोऱ्हे यांनी लगावला. त्या सोमवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
शनिवार वाड्यातील घटनेबाबत प्रशासन काय भूमिका घेते, हे महत्त्वाचे आहे. याठिकाणी महिलांनी नमाज पठण केले असेल तर त्यांनीही संयम बाळाला पाहिजे होता. उद्या कोणीही म्हणेल की आम्ही मशिदीत जाऊन कीर्तन करु, पण म्हणून तसं होणार नाही. शनिवार वाडा ही पुरातत्व विभागाने संरक्षित केलेली वास्तू आहे. त्याचे काही नियम आहे त्याचा पालन झाले पाहिजे, असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले.
यावेळी नीलम गोऱ्हे यांनी महायुतीलमधील अंतर्गत वादाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. युती आहे म्हणून कोणीच काही मुद्दा मांडायचा नाही असं तर कधी म्हणणार नाही. आमच्या मंत्र्यांबद्दलही अनेक जण प्रश्न विचारत आहेत. लोकशाहीमध्ये असे प्रश्न विचारले तर ताबडतोब असं कोणी आमच्या विरोधात बोलूच नये हे योग्य नाही, असेही नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. यावेळी नीलम गोऱ्हे यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपच्या नेत्यांवर टीका केली. रविंद्र धंगेकर आमच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांना वस्तुस्थिती माहित असेल म्हणून ते बोलत असतील. हेतू ठेवून आरोप करण्यापेक्षा वस्तुस्थितीतून जनतेवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असेही नीलम गोऱ्हे यांनी म्हटले.
आणखी वाचा
शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली

























