''ती यादी दाखवून मोठं पद मिळवण्याचा प्रयत्न''; मनसेच्या साईनाथ बाबरांनी वसंत मोरेंची खेळी सांगितली
वसंत मोरेंनी काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी 9 जुलै रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीरही केले होते.
मुंबई : वंचित व्हाया मनसेमधून नुकतेच शिवसेनेत घरवापसी केलेल्या पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरेंच्या (Vasant More) शिवसेना प्रवेशावर आता मनसे नेत्यांनी टीका केली आहे. पुण्यातील मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी वसंत मोरे शिवसेनेत गेल्यामुळे मनसेला काहीही फरक पडणार नसल्याचं म्हटलं आहे. तसेच, मनसेतून एकही पदाधिकारी किंवा पुण्यातील मनसेचा (MNS) नेता वसंत मोरेंसोबत गेला नसल्याचा दावाही बाबर यांनी केला आहे. त्यामुळे, वसंत मोरेंच्या शिवसेना पक्षप्रवेशाचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला (Shivsena) किती फाया होईल, ये आगामी काळातच कळणार आहे. मात्र, वसंत मोरे यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत, गाड्यांचा ताफा घेऊन मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी, मी शिवसेनेत प्रवेश करत नसून परत येत आहे, असेही त्यांनी म्हटले.
वसंत मोरेंनी काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी 9 जुलै रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीरही केले होते. त्यानुसार, 9 जुलै रोजी आपल्या कार्यकर्त्यांसह व समर्थकांसमवेत मातश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले. यावेळी, पुण्यातील मनसेचे विविध पदाधिकारी आपल्यासोबत शिवसेनेत पक्षप्रवेश करत असल्याचं मोरेंनी सांगितलं होतं. मात्र, मोरेंसमवेत एकही मनसेचा पदाधिकारी शिवसेनेत गेला नसल्याचा दावा मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ मोरेंनी केला आहे.
वसंत मोरेंसोबत पुण्यातील मनसेचा विद्यमान एकही पदाधिकारी शिवसेनेत गेला नाही. मधल्या काळात वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीमध्ये गेले होते. त्यांच्यासमवेत काही स्थानिक पदाधिकारी गेले होते, त्यांनी 3 महिन्यांपूर्वी राजीनामा दिला होता, त्याठिकाणी आम्ही नवीन पदाधिकारीही दिले आहेत. आता, वसंत मोरेंनी दिलेली यादी मी वाचली तेव्हा कळालं की, जी माणसं दोन-दोन वर्षे झालं पक्षातच नाहीत. त्या लोकांची यादी शिवसेनेला दाखवून कुठलंतरी मोठं पद मिळतं का, याची तयारी सुरूय, असे म्हणत पुणे मनसेचे शहराध्यक्ष बाबर यांनी वसंत मोरेंवर टीका केली.
लोकसभेत डिपॉझिटही राहिलं नाही
मनसेंच कुणीही वसंत मोरेंसोबत गेलेलं नाही, एवढा सगळा फौजफाटा त्यांच्यासोबत असता तर लोकसभा निवडणुकीचा निकाल वेगळा लागला असता. मोरेंच्या स्थानिक कात्रजमधले हे शाखाध्यक्ष व त्या भागातले पदाधिकारी होते, जे वंचितचे पदाधिकारी गेले आहेत. मात्र, मनसेचं कुणीही गेलं नाही, बळंच कुठतरी वेगळ्या पद्धतीने हे चित्र रंगवून दाखवायचं काम सुरू आहे. मनसेची पुणे शहरातील ताकद मोठी आहे. लोकसभेच्या निवडणुकीत वसंत मोरेंचं डिपॉझिटही राहिलं नाही. त्यामुळे, मनसेला त्यांच्या जाण्याचा काहीही फरक पडणार नाही, असेही साईनाथ बाबर यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा
धक्कादायक! पुण्यात RTO अधिकाऱ्यानेच दोघांना उडवले; उपचाराचा खर्च देतो म्हणत आता हात झटकले