मोठी बातमी : पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपचा दे धक्का, निकटवर्तीयाचा काँग्रेसला रामराम, कमळ हाती घेणार
Prithviraj Chavan : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपचे अतुल भोसले यांनी मोठा धक्का दिलाय.

Prithviraj Chavan : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) घवघवीत यश मिळवले होते. तर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महायुतीला (Mahayuti) पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर विधानसभा निडवणुकीत (Vidhan Sabha Election) महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. राज्यात सर्वाधिक 13 खासदार असलेल्या काँग्रेसचे (Congress) विधानसभा निवडणुकीत 21 जिल्ह्यात एकही आमदार निवडून आलेले नाहीत. काँग्रेसचे राज्यात फक्त 16 आमदार निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतून अनेक लोकप्रतिनिधी पक्षांना रामराम ठोकत आहेत. आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना भाजपचे अतुल भोसले (Atul Bhosale) यांनी मोठा धक्का दिलाय. पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची मोट बांधण्याकरता पृथ्वीराज चव्हाण हे आघाडीवर असल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होऊ शकतील, अशी शक्यता देखील व्यक्त केली जात होती. मात्र, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाण यांचा दारूण पराभव झाला. भाजपाचे डॉ. अतुल भोसले हे या मतदारसंघातून विजयी ठरले. त्यांनी तब्बल 38 हजार 545 मतांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला. यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसला होता. आता पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय त्यांची साथ सोडत असल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रशांत चांदे यांचा काँग्रेसला रामराम
विधानसभेच्या पराभवानंतर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपच्या अतुल भोसलेंनी मोठा धक्का दिला आहे. पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसचे शहर प्रमुख व नगरसेवक प्रशांत चांदे यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रशांत चांदे आज भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. भाजप प्रदेश कार्यालयात दुपारी 3 वाजता पक्ष प्रवेश होईल. प्रशांत चांदे यांची पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख आहे. आता निकटवर्तीय साथ सोडणार असल्याने पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
आणखी वाचा
























