पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा पवार कुटुंबातच राजकीय सामना रंगल्याने राजकीय वर्तुळात मोठी उत्कंठा लागून राहिली आहे. येथील मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) विरुद्ध सुनेत्रा पवार (Sunetra pawar) यांच्यात थेट लढत होत असल्याने पवार कुटुंबातील इतर सदस्यांनीही थेट प्रचाराच्या मैदानात एंट्री केल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेंची लेक रेवती सुळे आईसाठी प्रचार करताना दिसून आल्या. आता, सुप्रिया सुळेंसाठी त्यांच्या आई म्हणजेच प्रतिभा पवार (Pratibha pawar) ह्याही आपल्या लेकीसाठी राजकीय मैदानात उतरल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे 1991 पासून प्रतिभा पवार कधीच राजकारणात, किंवा प्रचारासाठी दिसल्या नाहीत. मात्र, यंदा लेकीसाठी आई प्रचारात आल्याचे दिसले. त्यामुळे, प्रतिभा पवार पहिल्यांदाच निवडणूक काळात राजकीय व्यासपीठावर दिसल्या आहेत.
बारामतीमधील महिला मेळाव्यासाठी प्रतिभा पवार व्यासपीठावर आल्यानंतर सर्वच महिलांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. विशेष म्हणजे लेकीसाठी प्रचाराला आलेल्या प्रतिभा पवार व्यासपीठावर मागच्या रांगेत बसल्याचंही दिसून आलं. आईने बारामतीमधील महिला मेळाव्याच्या कार्यक्रमाला यावं, असा सुनंदा वहिनींचा आग्रह होता. म्हणून आई महिला मेळाव्याच्या व्यासपीठावर आली होती. तसेच, माझी मुलगी नेहमीच प्रचारात सहभागी होते, तीदेखील पॅम्प्लेट वाटतं होती, असेही सुप्रिया सुळेंनी सांगितलं. तर, आपल्या भाषणात आईची आठवण सांगताना महागाईवरुन सरकारला लक्ष्यही केलं.
2014 मध्ये आम्ही घरी गेल्यानंतर आई म्हणायची, यावेळी 2014 मध्ये तुमचं सरकार येत नाही. त्यावेळी, का आमचं सरकार येत नाही, असे मी आईला विचारत असे. त्यावर, एवढी महागाई झालीय, मग तुमचं सरकार येत नाही. माझ्या आईचं म्हणणं खरं ठरलं, आमचं सरकार आलंच नाही. आता, आई पुन्हा घरात पाऊल ठेवलं की कटकट सुरू करते, भाज्या महागल्या, डाळी महागल्या, दुधाचे भाव.. असे म्हणत आई महागाईवर भाष्य करते. तर, यावेळीही महागाईने लोकं त्रस्त झाले असून आताही हे सरकार येत नाही, अशी आठवण सुप्रिया सुळेंनी आईसमोरच सांगितली.
धमक्यांची चर्चा वारंवार होतेय
जयंत पाटील चॉपरने सांगलीवरून प्रचाराला आले, तेच चॉपर सुषमा अंधारे ह्यांना घेण्यासाठी अलिबागला जात असताना क्रॅश झाले. सुदैवाने कुणालाही काही झालेलं नाही, हे त्यांचं भाग्य असल्याचं सुळे यांनी म्हटलं. तसेच, भरत गोगावलेंनी सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या आरोपावरही सुप्रिया सुळेंनी पलटवार केला. धमक्यांची चर्चा वारंवार निवडणुकीत होत आहे, असे हल्ले होत असतील तर अतिशय चिंताजनक बाब आहे, प्रचंड घातक आहे. त्यामुळे, आपण दडपशाहीच्या दिशेने चाललेलो असे पुन्हा वाटते
बँकेतील 500 च्या नोटा गायब
बारामती सहकारी बँकेतल्या पाचशेच्या नोटा गायब झालेले आहेत, असं कळतंय ह्या सगळ्याची माहिती आम्ही घेत आहोत. सुनंदा वहिनी प्रचारामध्ये जे बोलल्या ते खरं होताना दिसत आहे. धनशक्तीच्या वापरावरुन पुरावा मिळाला तर आम्ही तक्रार नक्की करणारं, असेही सुप्रिया सुळेंनी म्हटलं.
मी एवढी मोठी नाही
दरम्यान, मोदी ह्या देशाचे प्रधानमंत्री आहेत, पंतप्रधानांवर बोलाव इतकी मी मोठी नाही. शरद पवार आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचं कुठलही नातं नव्हतं. पण, त्यांचा मानसपुत्र म्हणून आजही पवार साहेबांचे नाव घेतलं जातं, असेही सुप्रिया सुळेंनी म्हटलं.