मुंबई : भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी शिवसेनेच्या जाहिरातीवरुन आक्रमक भूमिका घेत पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. शिवसेनेच्या महिला अत्याचारविरोधी जाहिरातीमध्ये पॉर्न कलाकाराला घेतल्याचे सांगत त्यांनी शिवसेनेला (Shivsena UBT) लक्ष्य केले. मात्र, वाघ यांचा आरोप त्यांच्यावर बुमरँग झाल्याचं दिसून आलं. कारण, वाघ यांनी ज्या कलाकारावर पॉर्नचे गंभीर आरोप केल होते, त्या कलाकाराने पुढे येऊन चित्रा वाघ यांनी बदनामी केल्याचं म्हटलं आहे. तसेच, वाघ यांनी जाहीरपणे माफी मागावी अन्यथा अब्र नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यानंतर, आता अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांनीही यामागचं राजकारण सांगितलं आहे. मूळ मुद्द्यांपासून भटकवण्याचा हा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, चित्रा वाघ यांचे आभारही मानले.  


भाजपच्या कुठल्याही नेत्यानं एखादं उथळ विधान केलं की, त्यांना मूळ मुद्दयापासून भरकटवायचं असतं. लोक जगण्याशी निगडीत समस्यांवर प्रश्न विचारायला लागले आहेत. मग, कुठल्यातरी एका नेत्याला पिन मारायची, तू काहीतरी विधान करा, त्यावर गाजवू दे, बोलत बसू ते त्यांना, असे म्हणत भाजपा नेत्यांच्या उथळ व वादग्रस्त विधानामागचं राजकारणच किरण माने यांनी सांगितलं आहे. तसेच, चित्रा वाघ यांनी भारतातील पॉर्नबद्दल उघडकीस आणले त्याबद्दल आभार, असेही मानेंनी म्हटलं.  


जर भारतात पॉर्न बनत असतील, असं चित्रा वाघ यांचं म्हणणं आहे. भारतात पॉर्न फिल्म बॅन आहे, पण जर भारतात पॉर्न फिल्म बनत असतील तर हे सरकारचं आणि गृहमंत्रालयाचं फार मोठं अपयश आहे. त्यामुळे जनतेनं मतदान करताना हे लक्षात ठेवायला हवं, असे म्हणत चित्रा वाघ यांच्यावर अभिनेता किरण मानेंनी पलटवार केला आहे. 


भारतात सध्या हेही चालतं


महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मणिपूरमध्ये महिलांवरील अत्याचार झाले, तिकडे दुर्लक्ष केलं गेलं. आपल्या 7 कुस्तीगीर महिला सांगत होत्या, आमच्यावर लैंगिक शोषण होत आहेत, तिकडेही दुर्लक्ष केलं. तर, कालच त्यांचा एक नेता 3 हजार महिलांवर अत्याचार करुन पळून गेलाय, जो त्यांच्या स्टेजवर वावरत होता. आता, चित्राताईंनी गौप्यस्फोट केलाय की भारतात पॉर्न फिल्म बनतात, तिथे लहान मुलींचा वापर केला जातो. त्यामुळे, चित्राताईंचे खूप आभार, लोकांनो मतदान करताना हेही लक्षात घ्या. भारतात सध्या हेही चालतं, जे पूर्व चालत नव्हतं, असेही मानेंनी म्हटलं. 


हेही वाचा


BJP Chitra Wagh Shiv Sena UBT Election Advt : माझी माफी मागा अन्यथा...; चित्रा वाघ यांनी अ‍ॅडल्ट स्टार असल्याचा आरोप केलेल्या अभिनेत्याने दिला इशारा