(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Praniti Shinde Vs Ram Satpute : भान राखून विचारांची लढाई विचाराने लढू, प्रणिती शिंदेंनी राम सातपुतेंना डिवचलं; खुल्या पत्राची चर्चा!
प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना एक खुले पत्र लिहिले आहे, या पत्राची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.
सोलापूर : येथील लोकसभेसाठी भाजपकडून (BJP) माळशिरसचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या (Congress) नेत्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) याआधीच सोलापूरची (Solapur) उमेदवारी दिली असून त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. दरम्यान, सोलापुरात सातपुते विरुद्ध शिंदे असा सामना पाहायला मिळणार आहे. याआधी शिंदे यांनी सातपुतेंना एक खुलं पत्र (Praniti Shinde letter to Ram Satpute) लिहिलं आहे. सातपुते हे मुळचे सोलापूरचे नसून ते बाहेरचे उमेदवार आहेत, असे चित्र शिंदे यांच्याकडून निर्माण करण्याचा प्रत्न केला जातोय.
प्रणिती शिंदेंच्या पत्रात नेमके काय?
सोलापूर मतदारसंघात शिंदे विरुद्ध सातपुते अशी अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे प्रणिती शिंदे यांच्याकूडन राम सातपुते यांना आतापासूनच लक्ष्य केलं जातंय. त्यांनी समाजमाध्यमांवर राम सातपुते यांच्या नावाने एक खुले पत्र लिहिले आहे. या पत्रात सातपुते हे आयात केलेले उमेदवार आहेत, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न शिंदे यांनी केला. आपलं सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वागत आहे. सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आहे. इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं स्वागत करते, असं प्रणिती शिंदे आपल्या पत्रात म्हणाल्या आहेत.
@RamVSatpute जी, आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणुक रिंगणात स्वागत आहे! pic.twitter.com/ZQHXT7aLAE
— Praniti Shinde (@ShindePraniti) March 25, 2024
जनहिताचे मुद्दे आणि संवादाला महत्त्व असावं
लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं. लोकशाहित जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वांत जास्त महत्त्व असावं, असं मतही शिंदे यांनी या पत्रात व्यक्त केलं.
विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू
पुढील 40 दिवस याचं भान राखून, लोकशाहीचा आदर करत आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू. समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू, असे आवाहनही शिंदे यांनी राम सातपुते यांना केले.
प्रणिती शिंदेंचे राम सातपुतेंना आव्हान
ही निवडणूक लोकशाहीच्या मार्गाने लढवुया आणि सशक्त लोकशाहीची चुणूक दाखवूया असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना आव्हान दिले आहे. प्रणिती शिंदे यांच्या या ट्विटमुळे आता खऱ्या अर्थाने सोलापुरात राजकीय धुळवड सुरू झाल्याचे चित्र दिसून आले आहे.
हेही वाचा >>
मोठी बातमी! महाविकास आघाडीची 'मातोश्री'वर निर्णायक बैठक, जागावाटपावर तोडगा निघणार?
ठाकरेंची शिवसेना उद्या उमेदवारांची घोषणा करणार, संभाव्य यादी 'एबीपी माझा'च्या हाती!