Prakash Mahajan Resign : राज ठाकरेंनी बैठकीत एकच प्रश्न विचारला; प्रकाश महाजनांनी आज राजीनामा दिला, म्हणाले, त्यांचा बोलण्याचा टोन...
Prakash Mahajan Resign : महाजन यांच्या राजीनामाच्या निर्णयानंतर त्यांनी एबीपी माझाशी बोलताना नेमकं काय घडलं? त्यांनी हा निर्णय का घेतला याबाबत त्यांनी सविस्तरपणे भाष्य केलं आहे.

Prakash Mahajan Resign : महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी अखेर राजीनामा दिला असून त्यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश महाजन पक्षांतर्गत नाराज असल्याच्या चर्चा होत्या. यावरून ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात होते. अखेर गुरुवारी त्यांनी अधिकृतरीत्या मनसेच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला धक्का बसल्याचे मानले जात आहे. पुढे प्रकाश महाजन काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे. महाजन यांच्या राजीनामाच्या निर्णयानंतर त्यांनी एबीपी माझाशी बोलताना नेमकं काय घडलं? त्यांनी हा निर्णय का घेतला याबाबत त्यांनी सविस्तरपणे भाष्य केलं आहे. प्रकाश महाजन म्हणाले, मला कुठल्या प्रक्रियेत सहभागी करून घेतलं नाही.
11 तारखेच्या बैठकीत काय झालं
राज ठाकरे यांचा टोन बघता राज ठाकरे यांना माझं महत्व नाही असं वाटलं, दोन भाऊ एक यावं हे ठरवणारे तुम्ही कोण? असं ठाकरे म्हणाले. नारायण राणे यांच्या प्रकरणात मला मदत केली नाही. माझ्या बाजूने कुणीही आले नाही, मी एकटाच लढलो. मी वाट बघितली. मात्र मला प्रतिसाद मिळाला नाही. बाहेर पडल्यावर मी सल्ला देणार नाही. राज ठाकरेंना बघून पक्षात आलो तेच माझ्यावर नाराज आहेत. देव बदलायचा नाही.आता आपल्याला कोण भक्त म्हणून घेईल. आम्ही ना आवडते होतो. मी बरेच दिवस अस्वस्थ होतो. मनसे सोडतांना एक अपराध वाटतो, तो म्हणजे अमित ठाकरे यांना साथ देऊ शकलो नाही. मला एक गोष्ट नाही सगळं भोवलं. माध्यमांनी प्रसिद्धी दिलेली पक्षातील लोकांना आवडल नाही. मी स्पष्ट बोलतो. मात्र काही लोकांचे हितसंबंध असतात ते बोलत नाही, असंही महाजन यांनी म्हटलं आहे.
ज्या पद्धतीने बोलले त्यातून मला धक्का बसला
अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार का दिला हे विचारलं त्यात काय पाप आहे. नारायण राणे, नितेश राणे मला नाही नेत्याला बोलले होते, याला विरोध करणे माझे काम आहे. मला सांगा माझं चुकलं काय? माझी योग्यता नाही? स्टेजवर बसायला लोकांना विचारावं लागतं. मी मागितलं काय होतं? राज ठाकरे हे पुन्हा बोलावणार असे म्हटले होते, २ महिने वाट बघितली. नेता म्हणून पाठीवर हात टाकला नाही. आम्ही घोडे नाही. मला वाटलं मला कौतुक करायला बोलावलं मात्र ज्या पद्धतीने बोलले त्यातून मला धक्का बसला. त्यांना म्हणायचं होत तुम्हाला थांबायचं तर थांबा असं त्यांचं म्हणणं होतं. दोन भाऊ एकत्र यावं असं म्हणालो त्याचा राग आला. मात्र दोन भाऊ एकत्र आल्यानंतर तीन तीन तास सोबत बसले. तेव्हा माझी आठवण झाली नाही. जिथे सन्मान नाही तिथे काय थांबायचं? पुढे कोण आम्हाला बोलणार आहे. बोलावलं तर कोण पाहिल्यापासून सुरुवात करणार? मला कुणी बोलवावं अशी अपेक्षा सुद्धा नाही. मी सोशल मीडियावर राजीनामा दिला आहे. राजकीय संन्यास मी मानत नाही, असंही पुढे प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील घट्ट मैत्री सर्वश्रुत
या सर्व घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, भाजप खासदार नारायण राणे यांना दिलेलं आव्हान प्रकाश महाजनांना महागात पडल्याचं म्हटलं जात आहे. यामुळेच त्यांनी राज ठाकरे यांची नाराजी ओढवून घेतल्याचं बोललं जातं. राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील घट्ट मैत्री सर्वश्रुत असल्याने, या नात्याचा परिणाम महाजनांवर झाल्याची चर्चा रंगली होती.
स्थापनेपासून पक्षात सक्रीय
प्रकाश महाजन हे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे धाकटे भाऊ आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून ते पक्षात सक्रीय होते. मराठवाड्यातील प्रमुख नेता म्हणून त्यांचा प्रभाव मानला जायचा. टीव्ही डिबेट शोमध्ये ते मनसेची बाजू ठामपणे मांडायचे. अलीकडेच त्यांचा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत शाब्दिक वाद रंगला होता. विशेष म्हणजे, राणे आणि राज ठाकरे यांच्यात दृढ मैत्रीपूर्ण संबंध आहेत. प्रकाश महाजन यांनी पक्ष सोडण्याचे ठोस कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र त्यांच्या अस्वस्थतेमागे ही सर्व कारणे असल्याचे बोलले जात आहे. या घडामोडींमुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेला मोठा धक्का बसला आहे.

























