(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माढ्यात घर फुटणार?, अजित दादांच्या आमदाराला सुप्रिया ताईंचा दे धक्का; विमानात रमेश शिंदेंची भेट
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी माढ्यातील शिंदे आमदार बंधूंना जोरदार धक्का देण्याची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात शरद पवारांनी टाकलेला राजकीय डाव यशस्वी झाला. माढा (Madha) मतदारसंघातून भाजपने रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर, नाराज झालेल्या मोहिते पाटील कुटुंबीयांनी शरद पवारांकडे घरवापसी करत राष्ट्रवादीतून निवडणूक लढवली. शरद पवांरानी राजकीय डाव टाकून माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी दिली अन् येथे विजयाची तुतारी वाजली. लोकसभेनंतर आता माढा विधानसभा निवडणुकांसाठीही शरद पवारांनी (Sharad Pawar) नवी रणनीती आखायला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. कारण, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत असलेल्या माढ्यातील आमदार बबन शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न पवारांच्या राष्ट्रवादीकडून (NCP) होत आहे. आमदार बबन शिंदे यांच्या लहान भावाने सुप्रिया सुळेंची (Supriya Sule) भेट घेतल्याने सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी माढ्यातील शिंदे आमदार बंधूंना जोरदार धक्का देण्याची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. कारण, शरद पवारांसोबत असलेल्या बबन शिंदे यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवारांना साथ दिली. त्यामुळे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी येथे स्पेस निर्माण झाली आहे. त्यातच, माढ्यातील अजित पवार गटाचे ज्येष्ठ आमदार बबन दादा शिंदे यांचे सख्खे लहान बंधू रमेश शिंदे यांनी दिल्लीत सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्याने भविष्यातील राजकीय बदलाचे चित्र निर्माण झाले आहे. आगामी निवडणुकीत माढ्याचे आमदार बबन शिंदे व त्यांचे सख्खे बंधु रमेश शिंदे या दोघांत राजकीय संघर्ष होणार असल्यचे दिसून येते.
आमदार बबनराव शिंदेंच्या घरात राजकीय फुट पडणार असल्याची या भेटीनंतर राजकीय वर्तुळात आणि सोलापूर जिल्ह्यात सुरू झाली आहे. माढा विधानसभेसाठी यंदा आमदार बबन शिंदेंचे पुत्र रणजितसिंह शिंदे यंदा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यातच, आता रमेश शिंदे यांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतल्याने त्यांच्याकडून तुतारी वाजविण्याचे संकेत मिळत आहेत. बबन शिंदे यांचा पुतण्या धनराज शिंदेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत ते आहेत. त्यामुळे, माढा विधानसभा मतदार संघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
शिंदे कुटुंबात राजकीय फूट पडणार?
शरद पवार गटात प्रवेश करुन माढा विधानसभेच्या निवडणुकीला मुलगा धनराज शिंदेला उभं करण्याच्या रमेश शिंदेच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकीत माढ्यातील शिंदे कुटुंबातच लढत रंगणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. दरम्यान, माढ्यातील शिंदे कुटुंबातून सध्या दोन आमदार आहेत. बबन शिंदे हे माढ्यातून आमदार आहेत, तर त्यांचे बंधू संजय शिंदे करमाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. यंदाच्या विधानसभेत बबन शिंदे यांच्याकडून मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू असतानाच, रमेश शिंदे यांनीही स्वत:च्या लेकासाठी फिल्डींग लावल्याचं दिसून येतं. त्यामुळे, शरद पवारांकडून माढा मतदारसंघात नवा डाव टाकला जातोय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.