Opposition Leader: मंत्रिपदावरुन सरकारमध्ये भांडाभांडी सुरु असताना मविआ चाल खेळणार, विरोधी पक्षनेतेपदासाठी अध्यक्षांकडे नाव देणार?
Opposition Leader: महाविकास आघाडीच्या विरोधी पक्षनेतेपदी कोणाचं नाव समोर येणार? त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांकडे आज अर्ज केला जाणार का? याकडे सर्व राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
नागपूर: राज्यात मंत्रीमंडळाच्या शपथविधीनंतर आता विरोधी पक्षनेते पदासाठीच्या घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचा आज विरोधी पक्षनेते पदासाठी विधानसभा अध्यक्षांकडे अर्ज करून नाव देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या आमदारांसोबत होणाऱ्या बैठकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून विरोधी पक्ष नेता ठरवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा अध्यक्ष आणि सत्ताधारी, विधानसभा विरोधी पक्षनेता संदर्भात सकारात्मक असताना शिवसेना ठाकरे गटाने ही संधी सोडू नये, असं ठाकरेंच्या आमदारांचं म्हणणं आहे. महाविकास आघाडीच्या विरोधी पक्षनेतेपदी कोणाचं नाव समोर येणार? त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांकडे आज अर्ज केला जाणार का? याकडे सर्व राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
शिवसेना ठाकरेंच्या आज आमदारांची महत्त्वाची बैठक
शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. यासाठी आमदार येण्यास सुरुवात झालेली आहे, आमदार आमश्या पाडवी, आनंदराव तिडके पाटील, हे ग्रामीण भागातले आमदार उपस्थित राहिलेले आहेत. आज पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे नागपुरात आहेत. ते आज त्यांच्या पक्षांच्या आमदारांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये आज विरोधी पक्षनेते संदर्भात आज या बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेनेने संधी सोडून नये - भास्कर जाधव
याबाबत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले, मला असं वाटतंय की आज शिवसेनेच्या वतीने कोणाला विरोधी पक्ष नेता करायचं त्याचं पत्र दिले जाईल. तुम्हाला विरोधी पक्षनेते पद मिळेल का या प्रश्नावर जाधव म्हणाले, मलाही संधी द्यायची की नाही हे पूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये आहे. पण माझा आग्रह मात्र निश्चितपणे हा आहे की, शिवसेना ठाकरे गटाने ही संधी सोडू नये. शिवसेनेला ही संधी मिळाली आहे. सत्ताधारी पक्ष आणि अध्यक्ष सुद्धा विरोधी पक्षनेता पद नेमण्यासाठी सकारात्मक आहे. त्यांचा फार काही विरोध त्याला दिसत नाहीये. त्यामुळे त्यांच्याकडे बहुमत असल्यामुळे लोकशाहीचा सन्मान म्हणून विरोधी पक्षनेते पद ते देतील असं वाटतं. म्हणून ही संधी (ठाकरे गट) शिवसेनेने सोडू नये, इतकंच मी सांगेन भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
विरोधकांना विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्ज करावा लागणार
विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीकडून अद्याप विरोधी पक्षनेते पदासाठी अर्ज करण्यात आलेला नाही. अर्ज करण्याऐवजी विरोधी पक्ष आधी विधानसभा अध्यक्ष हे पद विरोधकांना देणार आहेत की नाहीत हे स्पष्ट करण्याची मागणी करीत आहेत. मात्र, राज्यघटनेनुसार विरोधी पक्षातील सर्वात मोठ्या पक्षाला आपला नेता निवडून त्याला विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता देण्याची विनंती करावी लागणार आहे. त्यानंतरच अध्यक्ष त्यावर निर्णय घेऊ शकतात. त्यासाठी आता घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाने आज बैठक बोलावली आहे, यामध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी अर्ज देण्याबाबतची चर्चा आणि नाव ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.