Opposition Meeting: जवळपास वर्षभरापासून विरोधकांनी एकत्र येण्याच्या प्रक्रियेला आज मूर्त स्वरुप आले. बंगळुरुत पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीत आघाडीचे नाव निश्चित करण्यासह काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. बंगळुरूतील विरोधी पक्षांच्या बैठकीत 26 पक्षांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली. विरोधकांनी आपल्या आघाडीला (Opposition Alliance) INDIA असे नाव दिले आहे. तर, जागा वाटप आणि इतर मुद्यांसाठी 11 सदस्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले.
बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले की, देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी विरोधी ऐक्याची ही बैठक महत्वाची आहे. या बैठकीत सर्वानुमते इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इनक्लुसिव्ह अलायन्स हे नाव आघाडीला द्यायचे ठरले आहे. विरोधकांची 26 पक्षांची एकजूट पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 30 पक्षांची बैठक बोलावली आहे. मात्र हे पक्ष नोंदणीकृत तर आहेत का? असा सवाल त्यांनी केला. आधी पंतप्रधान मोदी मित्रपक्षांसोबत बोलत देखील नव्हते. मात्र आता एकेकाला गोळा करतायत. विरोधकांच्या एकजुटीचा त्यांनी धसका घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले की, आघाडीची पुढील बैठक मुंबईत होणार आहे. पुढील बैठकीत समन्वय समितीची बैठक होणार आहे. या समितीत 11 सदस्य असणार आहेत. त्यातील नावांबाबत पुढील बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले की, एनडीए आणि इंडिया यांच्यात लढत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि India यांच्यात लढत आहे. त्यांची विचारधारा आणि भारत यांच्यातील संघर्ष आहे. आम्ही एक कृती आराखडा तयार करू आणि एकत्रितपणे आम्ही देशात काय करू इच्छितो हे सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी म्हटले की, आजची बैठक महत्वाची आणि फलदायी ठरली. आज आम्ही एक आव्हान स्वीकारल आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ला या आमच्या INDIA चे आव्हान स्वीकारता येणार नाही. हिंमत असेल तर हे आव्हान स्वीकारावे, असे आव्हान त्यांनी दिले. देशाला वाचवण्यासाठी हे विरोधकांचे INDIA काम करेल. कोणी सरकारला आव्हान दिले तर सीबीआय आणि इतर यंत्रणा मागे लावल्या जातात. INDIA जितेगा... NDA हारेगा असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.