NDA Vs INDIA: विरोधी पक्षांची दुसरी बैठक बंगळुरूमध्ये होत आहे. या बैठकीत विरोधकांच्या महाआघाडीच्या नावावर चर्चा झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोधी आघाडीचं नाव इंडिया (India) असू शकतं. विरोधी पक्षांच्या बैठकीत (Opposition Parties Meeting) नावाबाबतचा हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
इतर नावांवरही झाली बैठकीत चर्चा
याशिवाय विरोधी आघाडीसाठी अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी पीडीए (पूर्वीची दलित आघाडी) हे नाव सुचवलं होतं, पण ते फेटाळण्यात आलं. तर एका छोट्या गटाने सेव्ह इंडिया अलायन्स किंवा सेक्युलर इंडिया अलायन्स हे नाव देखील सुचवलं होतं. जागावाटपाबाबत राज्यनिहाय समिती स्थापन करण्याचा निर्णय देखील विरोधी पक्षांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
बैठकीनंतर टीएमसी आणि जनता दल युनायटेडचे ट्विट
दरम्यान, टीएमसी खासदार डेरेक ओब्रायन यांनी "चक दे इंडिया" असं ट्विट केलं आहे. तर जेडीयूने आपल्या ट्विटर हँडलवरून विरोधी आघाडीचं नाव ‘इंडिया’ असेल, अशी माहिती दिली आहे.
या बैठकीला उपस्थित असलेल्या राष्ट्रीय जनता दलानेही (RJD) विरोधी पक्षांची आघाडी हे भारताचं प्रतिबिंब असल्याचं ट्विट केलं आहे. राष्ट्रीय जनता दलाने विरोधी आघाडीच्या नावाबद्दल देखील माहिती दिली आहे. RJD ने INDIA शब्दाचं विश्लेषण केलं आहे. आता पंतप्रधान मोदींना INDIA म्हणतानाही त्रास होईल, असं देखील राष्ट्रीय जनता दलाने (RJD) म्हटलं आहे.
विरोधी आघाडीच्या 'इंडिया' नावाचा अर्थ काय?
I - Indian
N - National
D - Democractic
I - Inclusive
A - Alliance
RJD ने भारताचं पूर्ण रूप सांगितलं - INDIA म्हणजेच भारतीय राष्ट्रीय लोकशाही सर्वसमावेशक आघाडी.
काय म्हणाले विरोधी पक्षनेते?
बंगळुरूमध्ये जमलेल्या विरोधी पक्षनेत्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी म्हणाल्या, "ही चांगली, अर्थपूर्ण बैठक आहे. विधायक निर्णय घेतले जातील. बैठकीत झालेल्या चर्चेनंतरचा निकाल या देशातील लोकांसाठी योग्य असू शकतो." तर आपण सर्वजण मिळून भाजपचा पराभव करू, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
लालू यादव यांचा मोदी सरकारवर निशाणा
RJD चे अध्यक्ष लालू प्रसाद यादव म्हणाले, "आता देश आणि लोकशाही वाचवायची आहे. गरीब, तरुण, शेतकरी, अल्पसंख्याकांचं रक्षण करायचं आहे. मोदी सरकारमध्ये सगळ्यांनाच चिरडलं जात आहे." तर अरविंद केजरीवाल म्हणाले, "पंतप्रधान मोदींनी त्यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात जवळपास प्रत्येक क्षेत्राला पूर्णपणे उद्ध्वस्त केलं आहे आणि आता त्यांच्यापासून मुक्त होण्याची वेळ आली आहे."
काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे?
काँग्रेसला सत्ता किंवा पंतप्रधानपदात रस नाही, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुग खरगे म्हणाले. तर आपली राज्यघटना, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय यांचं रक्षण करण्याचा आमचा हेतू आहे, असंही ते म्हणाले. राज्य पातळीवर विरोधी पक्षांमध्ये मतभेद आहेत, मात्र हे मतभेद विचारधारेशी संबंधित नसल्याचंही खरगे म्हणाले.
हेही वाचा: