Uddhav Thackeray INDIA :  काहींना वाटतं की आम्ही आमचा पक्ष, कुटुंब वाचवायला आलो आहोत. हा देश आमच्यासाठी कुटुंब आहे. आम्ही देश वाचवायला आलो आहोत, असे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav  Thackeray) यांनी म्हटले. विरोधी पक्षांची आज बंगळुरूत बैठक पार पडली.  या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि भाजपकडून (BJP) विरोधी पक्षांच्या आघाडीवर टीका करण्यात येत होती. विरोधी पक्ष हे आपलं कुटुंब, पक्ष वाचवण्यासाठी आले असल्याची टीका करण्यात आली होती. त्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी नाव घेता प्रत्युत्तर दिले. 


उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, देशाला वाचवण्यासाठी हा लढा आहे. वेगवेगळ्या विचारांचे पक्ष असलो तरी एकत्र आलो आहोत. वेगवेगळे विचार असणे हीच लोकशाही आहे. आमचे वेगळे विचार असले तरी एक आलो आहोत. त्याला काही कारणं आहेत.  काहींना वाटतं की आम्ही आमचा पक्ष, कुटुंब वाचवायला आलो आहोत. हा देश आमच्यासाठी कुटुंब आहे..आम्ही देश वाचवायला आलो आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. 






ठाकरे यांनी पुढे म्हटले की, आम्ही एका व्यक्तीविरोधात नाही. आम्ही हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात आहोत, त्यांच्या धोरणाविरोधात आहोत. देशातील नागरिकांमध्ये भवितव्याबद्दल चिंता आहे. देशातील लोकांना आम्ही विश्वास देऊ इच्छितो की तुम्ही चिंता करू नका आम्ही आहोत, असेही ठाकरे यांनी म्हटले. 






विरोधी पक्षांची पुढील बैठक मुंबईत


विरोधी पक्षांच्या आघाडीची पुढील बैठक मुंबईत होणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी जाहीर केले. या बैठकीची तारीख पुढील काही दिवसात जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले. 


भाजपविरोधात विरोधकांची INDIA आघाडी


बंगळुरूत आज झालेल्या विरोधकांच्या बैठकीत 26 पक्षांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. विरोधकांनी आपल्या आघाडीचे नाव INDIA इंडिया असे जाहीर केले आहे. I- इंडियन N- नॅशनल D डेव्हलपमेंट I- इन्क्लुझिव्ह  A-अलायन्स असे आघाडीचे नाव असणार आहे. 


समन्वय समिती स्थापन करणार 


काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले की, आघाडीची पुढील बैठक मुंबईत होणार आहे. पुढील बैठकीत समन्वय समितीची बैठक होणार आहे. या समितीत 11 सदस्य असणार आहेत. त्यातील नावांबाबत पुढील बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.