Nitesh Rane : 'फडणवीस मैदानात उतरले तर मविआतील सर्वांचं वस्त्रहरण होईल', सचिन वाझेंच्या आरोपानंतर नितेश राणेंचा इशारा!
Nitesh Rane : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझेंनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. यानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीला इशारा दिला.
रत्नागिरी : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी (Sachin Vaze) पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचे सचिन वाझेंनी म्हटले आहे. यावरून आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) इशारा दिला आहे.
नितेश राणे म्हणाले की, सचिन वाझे महाविकास आघाडीचा कलेक्शन एजंट होते. सचिन वाझे यांनी सत्य विधान केलं आहे. सत्य बोलायला सचिन वाझेंनी बोलायला सुरुवात केली आहे. अनिल देशमुख यांनी हिंमत असेल तर समोर येऊन खुलासा करावा. सगळ्या गोष्टीची खुलासा करण्याची हिंमत अनिल देशमुख यांनी करावी, असे आव्हान नितेश राणे यांनी अनिल देशमुखांना दिले आहे.
फडणवीस मैदानात उतरले तर सर्वांचं वस्त्रहरण होईल
ते पुढे म्हणाले की सचिन वाझे यांना दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या खुनासंदर्भातही माहिती आहे. सचिन वाझे जसं जसं बोलत जातील, तसं तसं महाविकास आघाडीचे वस्त्रहरण होईल. त्यांनी शिवसंकल्प नाव ठेऊ नये, अली संकल्प मेळावा नाव ठेवावे. अली संकल्प मेळावा त्यांच्यासाठी जास्त सोयीस्कर नाव आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाविकास आघाडीतील सर्वांच्या कुंडल्या आहेत. फडणवीस मैदानात उतरले तर सर्वांचं वस्त्रहरण होईल, असा इशाराही नितेश राणे यांनी यावेळी दिला आहे.
सचिन वाझेंनी नेमकं काय म्हटलं?
माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. सीबीआयकडे देखील त्याचे पुरावे आहेत. अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. सुनावणी त्यांच्या विरोधात गेली आहे. देवेंद्र फडणवीसांना देखील या संदर्भात मी पत्र लिहिले आहे. मी नार्को टेस्टसाठी कधीही तयार आहे. मी एक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये जयंत पाटील यांचे नाव असल्याचे सचिन वाझेंनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं आहे.
अनिल देशमुखांचा पलटवार
अनिल देशमुख म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांची ही नवीन चाल आहे. मी काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे आता सचिन वाझे मार्फत माझ्यावर आरोप केले जात आहे. परंतु सचिन वाझे गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. त्याच्या कोणत्याही वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. दोन खुनाच्या प्रकरणात सचिन वाझे कारागृहात आहे, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
देशमुखांचा जामीन रद्द करून चौकशी करावी, सचिन वाझेंच्या गंभीर आरोपानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया