Nishikant Dubey On Raj Uddhav Thackeray: महाराष्ट्राबाहेर या, आपटून आपटून मारु...; भाजपच्या खासदाराचं राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंना आव्हान
Nishikant Dubey On Raj Uddhav Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी निशाणा साधला आहे.

Nishikant Dubey On Raj Uddhav Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी निशाणा साधला आहे. हिंदी भाषकांना मारताय, उर्दू बोलणाऱ्यांना मारुन दाखवा, असं आव्हान निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना दिले. तसेच मराठी आंदोलक सलाऊद्दीन, मसूद अजहर, दाऊदसारखे आहेत. दहशतवाद्यांनी हिंदुंवर अत्याचार केले, हे हिंदीवरुन अत्याचार करतायत, अशी टीका निशिकांत दुबेंनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर केली आहे.
आपल्या घरात कोणीही सिंह असतो. तुमच्यात हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तरप्रदेशात या, तुम्हाला दाखवून देऊ...महाराष्ट्र बाहेर या, तुम्हाला आपटून आपटून मारु, असं आव्हान निशिकांत दुबेंनी दिलं आहे. निशिकांत दुबेंनी महाराष्ट्रीयनांविरुद्ध गरळ ओकल्याचे पाहायला मिळाले. मराठी लोक कुणाची भाकर खातायत?, आमच्या पैशांवर तुम्ही मराठी लोक जगताय, असं निशिकांत दुबे म्हणाले. तसेच मराठी लोकांकडे कोणते उद्योग आहेत?, मराठी लोक किती टॅक्स देतात सांगा, असं निशिकांत दुबे म्हणाले. खाणी आमच्याकडे आहेत, तुमच्याकडे आहेत का?, सगळे उद्योग गुजरातकडे येतायत, असंही निशिकांत दुबेंनी सांगितले. मी मराठीचा सन्मान करतो, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा सन्मान करतो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महाराष्ट्राचा खूप मोठा सहभाग आहे. परंतु आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, म्हणून घाणेरडं राजकारण सुरु आहे, असा निशाणा निशिकांत दुबेंनी साधला.
तुम्ही खरंच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार असाल, तर...
तुम्ही खरंच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार असाल, तर तुमच्या जवळील माहीम दर्गावर जावं आणि तेथील उर्दु भाषिकांना मारुन दाखवावं, असं खुलं आव्हान देखील निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना दिलं आहे. आमच्या पैशावर जगतायत. सगळे उद्योग गुजरातमध्ये येतायत. हिंमत असेल तर तुम्ही तेलगू लोकांना पण मारा, असं निशिकांत दुबे म्हणाले. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घाणेरडं राजकारण सुरु आहे, असं निशिकांत दुबेंनी सांगितले. निशिकांत दुबेंच्या या आव्हाननंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कोण आहेत निशिकांत दुबे?
निशिकांत दुबेंचा जन्म 28 जानेवारी 1969, भागलपूर, बिहार येथे झाला. निशिकांत दुबे हे भारतीय जनता पक्षाचे अनुभवी खासदार आहेत. ते झारखंडच्या गोड्डा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी आहेत आणि निशिकांत दुबेंनी 2009 पासून सलग चार वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे.

























