Nilesh Rane-Nitesh Rane: कोकणात राणे बंधूंमध्ये शाब्दिक युद्ध पेटले; नितेश राणे म्हणाले, निलेश राणे, तुम्ही 'Tax Free'
Nilesh Rane-Nitesh Rane: कोकणात भाजपचे राणे विरूद्ध शिवसेनेचे राणे असा संघर्ष पेटलाय की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Nilesh Rane-Nitesh Rane: कोकणात भाजपचे राणे विरूद्ध शिवसेनेचे राणे असा संघर्ष पेटलाय की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवसेनेचे कुडाळचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) आणि त्यांचे सख्खे भाऊ असलेले मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांचं शाब्दिक युद्ध रंगलंय. नितेश यांनी जपून बोलावं, आपण सभेत बोलल्याने नेमका कोणाचा फायदा करतोय याचं भान असावं अशी समज आमदार निलेश राणे यांनी आपल्या भावाला दिली आहे. धाराशिवमध्ये जाहीर सभेत नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर निलेश राणेंनी एक्स पोस्टच्या माध्यमातून ही समज दिली.
नितेशने जपून बोलावे...मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही, असं निलेश राणे एक्सवर पोस्ट करत म्हणाले. निलेश राणेंनी समज दिल्यावर मंत्री नितेश राणेंनीही एक्सवरून उत्तर दिलंय. तुम्ही टॅक्स फ्री आहात, असं उत्तर नितेश राणेंनी दिलं.
निलेशजी तुम्ही tax free आहात 😅
— Nitesh Rane (@NiteshNRane) June 8, 2025
नितेश राणे नेमकं काय म्हणाले होते?
सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा, अशी धमकीच त्यांनी स्थानिक शिवसेना नेत्यांना दिली आहे. कुणी कितीही ताकद दाखवली , कोणीही कसेही नाचले तरी देशात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याचं लक्षात ठेवा, असेही नितेश राणे म्हणाले होते.
भाजप आणि शिवसेनेत जिल्हा नियोजन समिती निधीवरून सुप्त संघर्ष-
राणे बंधूंमधला हा पक्षीय संघर्ष पेटलाय तो धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगितीवरून...कुणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचले तरी सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय हे लक्षात ठेवा असं वक्तव्य नितेश राणेंनी मित्रपक्ष शिवसेनेला दिलं. शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिवचे पालकमंत्री आहेत. भाजपच्या राणा जगजीतसिंह पाटील यांच्या तक्रारीनंतर प्रताप सरनाईकांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती देण्यात आलीय. तिथे भाजप आणि शिवसेनेत जिल्हा नियोजन समिती निधीवरून सुप्त संघर्ष सुरू आहे. त्यावरून नितेश राणेंनी शिवसेनेला उद्देशून बोचरी टीका केली होती.

























