(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Navneet Rana: राणा दाम्पत्याची आजची रात्रही तुरुंगात? जामीन प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब
Navneet Rana And Ravi Rana : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची आजची रात्रीही तुरुंगात जाणार असल्याची शक्यात आहे.
Navneet Rana And Ravi Rana : राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याची आजची रात्रीही तुरुंगात जाणार असल्याची शक्यात आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र असं असलं तरी जामिनाची प्रक्रिया बोरिवली न्यायालयात पूर्ण होण्यास विलंब होत आहे. यामुळे राणा दाम्पत्याला आजची रात्र तुरुंगात काढावी लागू शकते.
जामीन मंजूर होऊनही आजची रात्र तुरुंगात का?
राणा दाम्पत्याला जरी जामीन मंजूर झाला असला तरी, कारागृहाच्या लेटर बॉक्समध्ये 5.30 च्या आधी रिलीझ ऑर्डर पडणं आवश्यक असतं. या प्रक्रियेला संपूर्ण विलंब होत आहे. तत्पूर्वी राणा दाम्पत्याला ज्या दिवशी अटक करण्यात आली, तो दिवस शनिवार होता आणि दुसऱ्या दिवशी रविवार. यासाठी त्यांची न्यायालयीन कोठडी मिळवण्यासाठी त्यांना सुट्टी कालीन न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होत. सुट्टी कालीन न्यायालय हे वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात बसलं होत, त्यामुळे त्या प्रभागातली सर्व प्रकरणं येथे वर्ग करण्यात आली होती. मात्र हे प्रकरण मुळात बोरिवली न्यायालयात जाणं अपेक्षित होत. त्यामुळे रविवारची रिमांड झाल्यानंतर सर्व कागदपत्रे कायद्यानुसार बोरिवली न्यायालयाकडे सोपवण्यात आली. हे पाहता तांत्रिकदृष्ट्या बोरिवली दंडाधिकारी न्यायालयाकडून कोठडीत होते. त्यामुळे त्यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असूनही त्यांना ज्या न्यायालयाने कोठडी सुनावली आहे, त्यासमोर जाणं आवश्यक आहे. त्यानुसार दंडाधिकारी न्यायालय मुंबई सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार ऑर्डर काढतात. मग ही ऑर्डर घेऊन ती कारागृहात जमा करावी लागते. यानंतर आरोपीला तुरुंगातून सोडण्यात येत. मात्र या सर्व प्रक्रियेला विलंब होत असल्याने त्यांना आजची रात्र तुरुंगात काढावी लागू शकते.
दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करताना पाच अटी घातल्या आहेत. न्यायालयाने घातलेल्या अटींनुसार, रवी राणा आणि नवनीत राणा यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच तपासात कोणतेही अडथळे आणू नये, असे आदेश न्यायालयाने त्यांना दिले आहेत. याशिवाय या घटनेशी संबंधित असलेल्या साक्षीदारावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही, त्यांना प्रलोभने दाखवून त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही अशीही अट घातली आहे. विशेष म्हणजे कोर्टाने राणा दाम्पत्याने अशा प्रकारच्या गुन्ह्यात पुन्हा सहभाग घ्यायचा नाही, असेही सांगितले आहे. न्यायालयाच्या या अटींचे पालन राणा दाम्पत्याला करावे लागणार आहे.
संबंधित बातमी:
Navneet Rana: राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर, 'या' पाच अटींचे करावे लागणार पालन