नरेंद्र मोदींचं द्विशतक, सभा, रॅली अन् रोड शोमधून देशभरात प्रचार, 80 मुलाखती; सर्वाधिक सभा कोणत्या राज्यात?
नरेंद्र मोदींनी पंजाबच्या होशियारपूरमधून आपल्या निवडणूक प्रचाराची सांगता केली. त्यानंतर, पुढील दोन दिवस ते ध्यान साधना करणार आहेत.
नवी दिल्ली : देशातील 18 व्या लोकसभा निवडणुकांच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान परवा 1 जून रोजी होत आहे. उत्तर प्रदेशसह (Uttar Pradesh) उत्तर भारतातील राज्यांत मतदानाची प्रकिया पार पडत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) वाराणसी मतदारसंघातही मतदान होत आहे. त्यामुळे, यंदाच्या लोकसभा निवडणुकांसाठीच्या प्रचाराची सांगता आज सायंकाळी 6 वाजता झाली. 19 एप्रिल रोजी निवडणुकांचा पहिला टप्पा पार पडला. तत्पूर्वी निवडणूक (Election) प्रचाराला सुरुवात झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशभरातील सर्वच राजकीय पक्षाचे नेते प्रचाराच्या मैदानात उतरले होते. मात्र, यंदाच्या निवडणूक प्रचारा नरेंद्र मोदींनी प्रचारसभा, रॅली आणि रोड शोच्या माध्यमातून वेगळाच विक्रम केला आहे. पंतप्रधानांनी 75 दिवसांच्या कार्यकाळात तब्बल 180 रोड शो आणि सभा केल्या आहेत.
नरेंद्र मोदींनी पंजाबच्या होशियारपूरमधून आपल्या निवडणूक प्रचाराची सांगता केली. त्यानंतर, पुढील दोन दिवस ते ध्यान साधना करणार आहेत. मात्र, निवडणुकांची घोषणा झाल्यापासून नरेंद्र मोदींनी प्रचारसभा, रॅली, रोड शोंचा धडाका लावली होता. बिहारच्या जुमई येथून मोदींनी आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली होती. गेल्या 75 दिवसांत मोदींनी 200 पेक्षा जास्त रॅली, सभा आणि रोड शोमधून जनतेला संबोधित केले आणि विविध न्यूज चॅनेल्सला मिळून 80 मुलाखती केल्या आहेत. निवडणुकांच्या घोषणेपूर्वी मोदींनी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात 15 रॅली केल्या आहेत. आज लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची सांगता झाल्यानंतर नरेंद्र मोदी 30 मे ते 1 जून या कालावधीत तामिळनाडूतील कन्याकुमारीच दौरा करणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात 18 सभा घेतल्या आहेत. भाजपसह महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींनी महाराष्ट्रात सभा घेतल्या, त्यामधून काँग्रेससह शिवसेना उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केल्याचं दिसून आलं.
उत्तर प्रदेशात सर्वाधिक 22 सभा
नरेंद्र मोदींनी सर्वाधिक 22 जाहीर सभा उत्तर प्रदेशात केल्या आहेत, त्यापाठोपाठ महाराष्ट्रात 18, कर्नाटकात 11, तेलंगणात 11, तामिळनाडूत 7 अशारितीने मोदींनी गेल्या 75 दिवसांत 180 पेक्षा जास्त सभा, रॅली, रोड शोमधून निवडणुकांचा प्रचार केला. तर, काही ठिकाणी विविध कार्यक्रमातून जनतेला संबोंधित केले. या सर्व सभा, रॅली व कार्यक्रमांची एकूण संख्या 206 एवढी आहे. दरम्यान, गत 2019 च्या निवडणुकीत मोदींनी 142 सभा, रोड शो व रॅलींमधून प्रचार केला होता.
प्रचारानंतर मोदी ध्यान साधनेसाठी कन्याकुमारीला
कन्याकुमारी येथे आज संध्याकाळपासून 1 जून रोजी संध्याकाळपर्यंत मोदी ध्यान मंडपम येथे ध्यान-साधना करणार आहेत. विशेष म्हणजे स्वामी विवेकानंद यांनीही येथेच ध्यान केलं होतं. याच ठिकाणावर भारताच्या पूर्व आणि पश्चिम सीमारेषा एकत्र येतात. दरम्यान, कन्याकुमारी येथे जाऊन नरेंद्र मोदी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणार आहेत. दरम्यान, निवडणूक प्रचाराची सांगता झाल्यानंतर मोदी अध्यात्मिक दौरा करतात. यापूर्वी 2019 मध्ये केदारनाथ तर 2014 मध्ये शिवाजी प्रतापगड येथील दौरा केला होता.