मोदी ब्रँड होता आता ब्रँडी झाली, 400 पारचा खुळखुळा झाला, संजय राऊतांच्या भाषणादरम्यान उद्धव ठाकरे खळखळून हसले!
आजचा दिवस ऐताहासिक आहे, फिनिक्स पक्षासारखी राखेतून भरारी आपण मारली आहे. हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे
मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेनेच्या (Shivsena) वर्धापन दिनी दरवर्षी दोन ठिकाणी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जातो. '19 जून 1966 रोजी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली होती. या शिवसेनेचा आज 58 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेचा मेळावा षण्मुखानंद येथे होत असून शिंदे गटाचा मेळावा वरळी डोम येथे पार पडत आहे. त्यावरुन, आपल्या भाषणाची सुरुवात करताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी डोमकावळ्यांचा मेळावा तिकडे होत असल्याचे म्हणत शिंदेंच्या शिवसेनेवर राऊत स्टाईल हल्लाबोल केला. तर, नेहमीप्रमाणे भाजपला लक्ष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही (Narendra Modi) लक्ष्य केले.
आजचा दिवस ऐताहासिक आहे, फिनिक्स पक्षासारखी राखेतून भरारी आपण मारली आहे. हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे, तुमच्यासारख्या फडतूस माणसांसमोर आम्ही झुकणार नाही, असे म्हणत भाजपला लक्ष्य केले. मोदी जन्माला आल्यावर चारशे खुळखुळे घेऊन जन्माला आला होता. 400 पार हा जन्मसिद्ध अधिकार आहे का, मोदींचा खुळखुळा तर कोणी केला असेल तर तो उद्धव ठाकरेंनी केला आहे, असे म्हणत लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या पराभवावरुन राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.
असंख्य हुतात्माच्या बलिदानतून शिवसेना स्थापन केली, आता हे गुजरातचे सोमे गोमे आले आहेत. महाराष्ट्राचा वारसा उद्धव ठाकरे यांनी चालवला आणि लोकसभेत यश मिळवलं. भाजप आता आभार यात्रा धन्यवाद यात्रा काढणार आहे. कशाबद्दल पराभवाबद्दल आभार मानणार आहात काय, 400 पार करणार होते. तुमच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. अरे तुम्ही हरलाय आणि आभार यात्रा काय काढताय, असा सवाल राऊत यांनी विचारला.
मोदींवर घणाघाती टीका
मोदी हा ब्रँड होता आता ब्रँडी झाली आहे, बहुतेक ही आता देशी ब्रांडी झाली आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. मोदींना आता राम दिसला असेल, पण रामानी त्यांना लाथ घातली असेल. कारण, त्यांचं हिंदुत्व नकली होतं. सत्ते पे सत्ता लागला. आता त्यांचा आकडा महाराष्ट्रमध्ये लागणार नाही. कसला स्ट्राईक रेट? तो वाढलाय तुमच्या बेईमानाचा, 7 जागा तुम्ही जिंकला त्यात अमोल कीर्तीकरांची जागा आपण जिंकलो, असे म्हणत राऊतांनी मुंबईत 5 जागा जिंकल्याचा दावा केला.
वारकऱ्यांना सुद्धा लाच देण्याचा प्रयत्न करताय
देशभरातील विविध पक्ष फोडून भाजपने 110 विजय चोरले आहेत, नाहीतर भाजप 120 ला अडकला आहे. मोदी हरलेच होते, 5 फेऱ्या ते पिछाडीवर होते. जिथे जिथे मंदिर आणि हिंदुत्व तिथे भाजप हरले. जिथे राम तिथे त्यांचा पराभव झाला, असे राऊत यांनी म्हटले. तसेच, पैश्याची मस्ती चालणार नाही, वारकऱ्यांना सुद्धा लाच देण्याचा प्रयत्न करताय, सगळं विकत घ्या, मंडळ घ्या, टीम घ्या. पण, वारकरी हा महाराष्ट्राचा संस्कार आणि संस्कृती आहे. हे मस्तवाल सरकार प्रत्येकाला विकत घेण्याचा प्रयत्न करतंय. पण, संस्कृती कार्यक्रम आपण ठेवलेला नाही, तो पाहायचा असेल डोम कावळ्यांच्या कार्यक्रमाला जा, असे म्हणत शिंदेंच्या शिवसेना मेळाव्यावरही टीका केली.
उद्धव ठाकरेंवर स्तुतीसुमने
महाभारत आणि रामायण हे पवित्र ग्रंथ आहेत, रामायणमध्ये सांगितलं सोन्याच्या हरणा मागे लागू नका. ते मृगजळ आहे, शिंदे आणि अजित पवार मृगजळ आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला सगळे दाखवलं. गद्दारी विश्वासघात मोदी शाह, फोडाफोडी अर्जुन अस्वस्थ झाला म्हणाला कृष्णा हे जग मग तरेल कसं? तेंव्हा कृष्ण म्हणाला या पृथ्वीतलावर चार खांदे आहेत त्यातला एक खांदा उद्धव ठाकरे तुमचा आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर स्तुतीसुमनेही उधळली.