''नारायण राणेंनी 7 लाख मतदारांना वन टू वन पैसे वाटले, त्याचे फोटो काढले''; विनायक राऊतांचा गंभीर आरोप
भाजपने नारायण राणेंना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवल्यानंतर राणे कुटुंबाने विजयासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं.
रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. तर, भाजपच्याही गत 2019 च्या तुलनेत निम्म्यापेक्षा जास्त जागा घटल्याने लोकसभा निवडणुकीतील पराभवावर भाजपमध्ये मंथन होत आहे. मात्र, राज्यातील भाजपविरोधी लाटेतही रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri-sindhudurg) मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) विजयी झाले आहेत. राणेंनी शिवसेना ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांचा पराभव केला. मात्र, राणेंचा विजय हा दमदाटी आणि पैशाच्या जोरावर झाल्याचे शिवसेना नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे राणेंनी 7 लाख लोकांना वन टू वन पैसे वाटले, असेही त्यांनी म्हटले. चिपळूणमध्ये शिवसेनेच्यावतीने आयोजित आभार मेळाव्यात ते बोलत होते.
भाजपने नारायण राणेंना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवल्यानंतर राणे कुटुंबाने विजयासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं. गत दोन पराभवांचा वचका काढण्यासाठी प्रचार यंत्रणा आणि कार्यकर्त्यांना घेऊन राणे पिता पुत्र निवडणुक प्रचारात आघाडी घेत असल्याचं दिसून आलं. अखेर, 4 जून रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाला लागला. त्यामध्ये, नारायण राणेंचा 47858 मतांनी विजय झाला. मात्र, राणेंचा हा विजय कपटनीती आणि पैशाच्या मस्तीच्या जोरावर झाल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून विनायक राऊत यांना 4 लाख 656 मतं मिळाली आहेत. तर, नारायण राणेंना 4 लाख 48 हजार 514 मतं पडली आहेत. मात्र, राणेंनी 7 लाख लोकांना वन टू वन पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप विनायक राऊत यांनी केला.
''बऱ्याच वेळेला राजकारणात कपट नीतीला यश मिळतं. नारायण राणे यांना मिळालेलं यश कपटनीतीनेच मिळालं असल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी उमेदवारीची घोषणा झाली, त्यामुळे नारायण राणे प्रचाराच्या भानगडीत पण पडले नव्हते. त्यांनी लोकांची नाडी ओळखत पैसा फेको तमाशा देखो हा मार्ग अवलंबला. नारायण राणेंनी 7 लाख मतदारांना वन टू वन पैसे दिले आहेत, असा गंभीर आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. राणेंनी 140 कोटींचा घपळा केला असून ज्यांना-ज्यांना पैसे दिले, त्यांचे मोबाईल नंबर आणि फोटो घेण्यात आले आहेत. त्यामुळे मतदान केलं नाही तर आपला कोथळा काढतील, या भीतीने मतदारांनी राडेबाज संस्कृतीला मतदान केले, असेही राऊत यांनी सांगितले.
माझं राजकीय पुनर्वसन नक्की होईल
सुदैवाने माझ्यावर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचे प्रेम असल्याने माझे राजकीय पुनर्वसन नक्की होईल, असा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टीशी आपण पैशाने स्पर्धा करू शकत नाहीत. शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या तिजोऱ्या सील करत भाजपने देशातील जनतेला लुटून प्रचंड पक्ष निधी जमा केला आहे. त्या निधीचा वारेमाप वापर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होईल. त्यामुळे, मतदारांसोबत नातं वाढवून भाजपसोबत स्पर्धा करावी लागेल. प्रत्यक्ष मेहनत करून येणाऱ्या सर्व निवडणुका आपल्याला जिंकाव्या लागतील, असे आवाहनही राऊत यांनी मेळाव्यात बोलताना केले.