Nana Patole : 'महाराष्ट्रात माझे दोनच मित्र, एक म्हणजे देवेंद्र फडणवीस अन् दुसरे संजय राऊत', नाना पटोलेंची मिश्कील टिप्पणी
Sanjay Raut and Nana Patole : नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यातील वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले होते. आता नाना पटोले यांनी यावर मिश्कील टिप्पणी केली आहे.
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यातील वाद शुक्रवारी चव्हाट्यावर आला. सुरुवातीला संजय राऊत यांनी राज्यातील काँग्रेसचं नेतृत्व हे जागावाटपाच्या चर्चेसाठी सक्षम नसल्याचे म्हटले होते. यानंतर नाना पटोले यांनी संजय राऊत हे त्यांच्या पक्षश्रेष्ठींचं म्हणजेच उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) ऐकत नसतील तर हा त्यांचा प्रश्न आहे, असे म्हणत नाराजी व्यक्त केली होती. मात्र आज संजय राऊत यांनी मी व्यक्तिगत कोणावरही टीका केलेली नाही, असे स्पष्टीकरण दिले. आता नाना पटोले यांनी यावर मिश्कील वक्तव्य केले आहे.
नाना पटोले म्हणाले की, माझ्यात आणि संजय राऊत यांच्यात वाद नाही. संजय राऊत काय बोलले हे तुम्ही ऐकलं का सकाळी? त्यांनी स्पष्ट सांगितलं की आमची अधिकृत भूमिका काही नाही. आम्ही काल निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्याच्या संदर्भातल्या बातमीऐवजी ही बातमी गेली.
महाराष्ट्रात माझे दोनच मित्र
आमच्याकडे 30 ते 35 जागांचा अजूनही निर्णय होणे अपेक्षित आहे. प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त जागा मागण्यासाठी प्रयत्न करत असतो. मोठा भाऊ, छोटा भाऊ असं काही नाही. महाराष्ट्रात माझे दोनच मित्र आहेत. एक म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि दुसरे संजय राऊत. आमच्यात कोणताही वाद नाही. जागा वाटप अंतिम टप्प्यात आहेत, असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले की, मी व्यक्तिगतरित्या कोणावरही मतप्रदर्शन केलेले नाही. तेवढी सभ्यता, सुसंस्कृतपणा आमच्यात आहे. प्रत्येक आघाडीत जागा वाटपाचा कुठेतरी अडथळा निर्माण होतो. भाजप - शिवसेना एकत्र होती तेव्हा देखील असे अडथळे होते. काँग्रेस हा एक खूप मोठा पक्ष आहे. आम्ही प्रादेशिक पक्ष आहोत. राष्ट्रीय पक्षांनी प्रादेशिक पक्षांना त्या त्या राज्यात स्थान दिले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. प्रादेशिक पक्षांच्या जोरावरच सध्या राष्ट्रीय राजकारण सुरू आहे. मी यावर आता कुठलेही भाष्य करणार नाही. मी व्यक्तिगत कोणावरही टीका केलेली नाही. माझी भूमिका ही पक्षाची असते. उद्धव ठाकरे यांच्या परवानगीशिवाय मी कधीही काहीही बोलत नाही, असे त्यांनी म्हटले होते.
आणखी वाचा