(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagaland Elections: नागालँडमध्ये निवडणुकीपूर्वी भाजपने खातं उघडलं, काँग्रेस उमेदवाराच्या माघारीने विजयी सुरुवात
Nagaland BJP Candidate Won: नागालँडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच भाजपच्या (BJP) उमेदवाराने निवडणूक बिनविरोध जिंकली आहे.
Nagaland BJP Candidate Won: नागालँडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच भाजपच्या (BJP) उमेदवाराने निवडणूक बिनविरोध जिंकली आहे. अकुलुतो विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार काझेतो किनीमी (Kazheto Kinimi) यांची शनिवारी (11 फेब्रुवारी) बिनविरोध निवड झाली आहे. त्याच्या एकमेव प्रतिस्पर्धी व काँग्रेसच्या उमेदवार खेकशे सुमी (Khekashe Sumi) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
नागालँडचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही शशांक शेखर यांनी सांगितले की, अकुलुटो विधानसभा जागेसाठी काँग्रेसचे उमेदवार एन. खेकशे सुमी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या नागालँड विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा 10 फेब्रुवारी हा शेवटचा दिवस होता.
Nagaland BJP Candidate Won: विजयानंतर काय म्हणाले भाजप उमेदवार?
आपल्या विजयाबद्दल काझेतो किनीमी म्हणाले, "अकुलुटोच्या लोकांचे दुसऱ्यांदा बिनविरोध प्रतिनिधित्व केल्याबद्दल मी नम्र आणि सन्मानित आहे." ते म्हणाले की, या विशेषाधिकाराबद्दल मी देवाचे आभार मानतो आणि माझे समर्थक, हितचिंतक, अकुलुतो भाजपा मंडळ आणि नागालँड राज्य भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानतो. हा विजय आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील जनतेच्या विश्वासाचा विजय आहे.
Hon'ble MLA & Advisor & BJP candidate of 31 AC Akuluto @KazhetoKinimi declared uncontested in the upcoming NLA Elections 2023.
— BJP Nagaland (@BJP4Nagaland) February 10, 2023
Congratulations! pic.twitter.com/OCzIjabqre
नागालँडचं राजकीय समीकरण
नागालँडमध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचं सरकार आहे आणि नेफियू रिओ हे मुख्यमंत्री आहेत. NDPP 2017 मध्ये अस्तित्वात आला. त्यानंतर एनडीपीपीनं 18 तर भाजपनं 12 जागा जिंकल्या होत्या. निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांनी युती केली होती. एनडीपीपी, भाजप, एनपीपी यांचा सरकारमध्ये समावेश आहे. गेल्या वर्षीच एनडीपीपी आणि भाजपनं संयुक्त पत्रकार परिषदेत एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. एनडीपीपी 40 जागा आणि भाजप 20 जागांवर लढणार असल्याचं दोन्ही पक्षांनी संयुक्त निवेदनात म्हटलं होतं.
Nagaland Assembly Elections: नागालँडमध्ये 2 मार्च रोजी होणार मतमोजणी
नागालँड विधानसभा निवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला मतदार मतदान करणार आहेत. तर, 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 7 फेब्रुवारी होती, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 10 फेब्रुवारी होती. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं की, नागालँडमधील विधानसभेचा कार्यकाळ 12 मार्च रोजी संपणार आहे.