Sunil Tatkare: 'जयंत पाटलांची ही खासियत...'; राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या चर्चेवर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले 'एकदा दोनदा चर्चा झाली पण...'
Sunil Tatkare: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पोटातले पाणी हलू न देणे ही जयंत पाटील यांची खासियत आहे असं म्हटलं आहे.

पुणे: राज्याच्या राजकारणात अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? अशा चर्चा रंगताना दिसतात. काही दिवसांपूर्वी पुण्यात मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यात बंद दरवाजाआड भेट झाली होती. दोघांमध्ये तब्बल 30 मिनिटे चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पोटातले पाणी हलू न देणे ही जयंत पाटील यांची खासियत आहे असं म्हटलं आहे.
जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षामध्ये येणार अशी चर्चा असल्याच्या प्रश्नावरती बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, जयंत पाटील येणार हे कोणी सांगितलं? 1990 पासून ते प्रबळपणे काम करतात. त्यांच्या मनातील फारसे कोणाला कधी कळले नाही. विधिमंडळात आमची सहज भेट झाली होती, दीर्घकाळ आमचा राजकीय प्रवास सोबत झाल्यामुळे मैत्री आहे. एकदा दोनदा चर्चा झाली. पण, ती चर्चा वेगळी कुठली झाली नाही. पोटातले पाणी हलू न देणे ही जयंत पाटील यांची खासियत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील काही वाचता येणार नाही हे मात्र नक्की आहे. शेवटी ते एका राजकीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते नेहमीच अॅक्टीव्ह असतात, असंही पुढे सुनील तटकरेंनी म्हटलं आहे.
पवार कुटुंबीय एकत्रित येण्यावर तटकरे म्हणाले...
पक्षफुटीनंतर आता पुन्हा एकदा पवार कुटुंबीय एकत्रित येण्यासंबंधीच्या प्रश्नावरती सुनील तटकरे म्हणाले, आमची पुढची वाटचाल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात चालली आहे. कुटुंब म्हणून मी भाष्य करणार नाही. मी राजकीय भूमिका मांडू शकतो, कौटुंबिक नातं कौटुंबिक असतं. मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जाऊ ही आमची राजकीय भूमिका आहे, असंही त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे.
शरद पवार अजित पवार एकत्र येत असतील तर स्वागतच- अनिल पाटील
माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील यांनी शरद पवार अजित पवार एकत्र येण्यावरती बोलताना म्हटलं की, शरद पवार आणि अजित दादा एकत्र येतील असं आम्ही बातम्यांच्या माध्यमातूनच ऐकतोय. एकत्र येत असतील तर स्वागतच आहे. एकत्र आले तरीही स्वागतच आहे. आदिशक्ती मुक्ताईच्या मनात नेमकं काय आहे हे येणाऱ्या काळात कळेल, अशी प्रतिक्रिया अनिल पाटलांनी दिली आहे.























