MNS & Thackeray Camp: मनसेच्या संदीप देशपांडेंच्या तोंडाचा पट्टा सुरुच, ठाकरे गटाला म्हणाले, तुम्ही जुने असून काय उप#%
MNS & Thackeray Camp: संदीप देशपांडे यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होण्याच्या आशा मावळत चालल्या आहेत. उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका.

Raj Thackeray & Uddhav Thackeray: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. यामुळे मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक पातळीवर मनोमीलन होताना दिसत होते. त्यामुळे मनसे-ठाकरे गटाच्या युतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते. परंतु, मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतल्यानंतर ही परिस्थिती बदलताना दिसत आहे. कारण, गेल्या काही दिवसांपासून मनसेचे संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ठाकरे गटाविरुद्ध आक्रमक भाषा वापरायला सुरुवात केली आहे. अलीकडेच त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लक्ष्य करताना थेट 'चमचा' म्हणून संबोधले होते. संजय राऊत यांनीही त्याला प्रत्युत्तर दिले होते. यामुळे ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याच्या प्रयत्नांना सुरुंग लागण्याची शक्यता राजकीय पंडितांनी वर्तविली होती. मात्र, सोमवारी संदीप देशपांडे यांनी आणखी पुढे जात ठाकरे गटाला डिवचले आहे. संदीप देशपांडे यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये संदीप देशपांडेंनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. (MNS & Shivsena alliance speculations)
होय आम्ही नवीन आहोत, पण कधी 'केम छो वरळी' म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत.'जिलेबी अने फाफडा उद्धव ठाकरे आपडा', असं म्हणालो नाही. मुस्लिमांची मत मिळवण्यासाठी 20 हजार केसेस आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवर टाकल्या नाही. आम्हाला अभिमान आहे आम्ही नवीन आहोत. तुम्ही जुने असून काय उपटली, असे संदीप देशपांडेंच्या या पोस्टमध्ये म्हटले. त्यामुळे आता या टीकेला संजय राऊत आणि ठाकरे गटाचे अन्य नेते काय प्रत्युत्तर देणार, हे बघावे लागेल.
होय आम्ही नवीन आहोत पण कधी केम छो वरळी म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत,जिलेबी अने फाफडा उद्धव ठाकरे आपडा असं म्हणालो नाही .मुस्लिमांची मत मिळवण्या साठी वीस हजार केसेस आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवर टाकल्या नाही आम्हाला अभिमान आहे आम्ही नवीन आहोत तुम्ही जुने असून काय उपटली
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 23, 2025
Sanjay Raut: संजय राऊत अन् संदीप देशपांडेंमध्ये शाब्दिक युद्ध
मनसे (MNS) आणि शिवसेना ठाकरे गट अशा दोन्ही बाजूचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीविषयी सकारात्मक बोलत असताना संदीप देशपांडे सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यांनी अलीकडेच संजय राऊत यांना लक्ष्य केले होते. 'युतीबद्दल दोन्ही पक्षप्रमुख निर्णय घेतील ताटातल्या चमच्याने ताटात राहावं', असं देशपांडे यांनी म्हंटलं होतं. देशपांडेंच्या या टीकेला संजय राऊत यांनीही प्रत्युत्तर दिले होते.
राजकारणात माणसाने नेहमी संयमी आणि आशावादी असावं. काही लोकांना अजून त्याचं प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. नुसता उथळपणा करून राजकारण चालत नाही. जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असतो, मराठी माणसाच्या न्यायी हक्काचा प्रश्न असतो तेव्हा संयम ठेवावा लागतो. काय होणार आहे आणि काय होणार नाही हे माझ्या इतकं कोणालाच माहीत नाही. कोण काहीही म्हणेल येड्या गबाळ्यासारखं, त्याला अर्थ नाही, असे संजय राऊत यांनी देशपांडेंना सुनावले होते.
आणखी वाचा























