मुंबई : राज्य सरकारने नुकतेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantir Mazi Ladki Bahin Yojana) लागू केली होती. या योजनेनंतर राज्यात लाडका भाऊ योजनाही (Ladka Bhau Yojana) लागू करा, अशी खोचक मागणी विरोधकांकडून केली जात होती. आत राज्य सरकारने लाडका भाऊ योजनादेखील चालू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र युवकांना आर्थिक मदत केली जाणार आहे. मात्र या योजनेसंदर्भात तरुणांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अर्थसंकल्पात घोषणा केलेली ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना‘ हीच लाडक्या भावांसाठीची योजना आहे. राज्यातील युवकांसोबत युवतीनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे, असा दावा केला जातोय. दरम्यान, लाडका भाऊ या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना मनसेने राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. आता राज्यात लाडक्या नातवाचेही तेवढे बघा, असा टोला मनसेचे नेते गजानन काळे (Gajana Kale) यांनी केला आहे.


खासगी शाळेत मुलांना अद्यापही प्रवेश दिलेले नाही


लाडकी बहीण, लाडका भाऊ यांचे झाले असेल तर लाडक्या नातवांचे पण तेवढे बघा. वंचित व दुर्बल घटकातील गोरगरिबांच्या मुलांना RTE मधून खासगी शाळेत मोफत शिक्षणाचा हक्कच यावेळी राज्य सरकारने काढून घेतला आहे. यामुळे हजारो मुलांना शाळेत अद्यापही प्रवेश मिळू शकला नाही. RTE मध्ये राज्यभरात 9331 शाळा असून 1 लाख 15 हजारच्या वर जागा आहेत. उच्च न्यायालयात सरकारविरोधात जनहित याचिका आहे. त्यामुळे राज्यसरकारने प्रक्रिया पूर्ण करूनही खासगी शाळेत मुलांना अद्यापही प्रवेश दिलेले नाही, असे गजानन काळे म्हणाले.


लाडक्या नातवांसाठी पण पैसे सरकारने भरून टाकावेत


तरीही लाडकी बहीण, भाऊ झाले असतील तर या लाडक्या नातवांसाठी पण पैसे सरकारने भरून टाकावेत. शाळा प्रवेशाच्या प्रतिक्षेत असलेल्या लाखो गोरगरीब मुलांचे प्रवेश करून त्यांचे शैक्षणिक नुकसान वाचवावे व पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी गजानन काळे यांनी केली.


लाडका भाऊ योजनेवर आक्षेप 


दरम्यान, लाडका भाऊ योजनेसंदर्भात आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राज्यात 3 डिसेंबर 1974 सालापासून 'रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम' नावाची एक योजना राबवली जाते. या योजनेत बदल करून सरकारने ही योजना जाहीर केली आहे. अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' जाहीर करण्यात आली होती. हीच योजना लाडका भाऊ योजना असून या योजनेतून युवक, युवतींना लाभ दिला जाणार आहे, असा दावा केला जातोय.


हेही वाचा :


Maharashtra News Live Update : भर पावसात बांधकामावर हातोडा चालवण्याची गरज काय? विशाळगड हिंसाचार प्रकरणी हायकोर्टाने सरकारला सुनावलं!


शरद पवार गटाचे खासदार भास्कर भरगेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट, नेमकी काय झाली चर्चा? 


Maharashtra School RTE: राज्य सरकारला हायकोर्टाचा दणका; खासगी, विनाअनुदानित शाळांमधील आरटीई प्रवेशाबाबतचा अध्यादेश रद्द