Manoj Jarange Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे (MP Bhaskar Bhagre) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतली. भास्कर भगरे यांनी अंतरवाली सराटीच जरांगेंची भेट घेतली. भाजपच्या भारती पवार यांचा पराभव करुन भास्कर भगरे निवडून आले आहेत. यावेळी खासदार भास्कर भगरे यांच्यासोबत छगन भुजबळ यांचे विरोधक माणिकराव शिंदे हेही जरांगे पाटील यांच्या भेटीला आले आहेत. 


दरम्यान, उद्यापासून मनोज जरांगे हे आमरण उपोषण करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे नेते जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी येत आहेत. दरम्यान, खासदार भास्कर भरगे आणि जरांगे पाटील यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याची अद्यापही माहिती मिळाली नाही.  


आमरण उपोषणाच्या 17 दिवसांनंतर पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार


मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे आमरण उपोषणाच्या 17 दिवसांनंतर पश्चिम महाराष्ट्रात असून जगलोच तर अठराव्या दिवशी तसाच ॲम्बुलन्समधून शांतता रॅलीत सहभागी होईन असं मनोज जरांगे म्हणालेत. सरकारला जर 17 दिवस मरण्याची वाट बघत असेल तर हे सरकारच असू शकत नाही असं म्हणत मनोज जरांगेंनी कठोर आमरण उपोषण आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली करण्याचं जाहीर केली आहे. 20 तारखेला यांचे 288 आमदार पाडायचे की ठेवायचे हे ठरवणार असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले. 


13 जुलैपर्यंत सरकारला दिली होती मुदत


दरम्यान, सगेसोयऱ्यासह सरसकट मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देत आरक्षण देण्याचा अध्यादेश काढण्याची 13 जुलैची मुदत संपली आहे. यानंतर 20 जुलैपासून आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली होती. आता ते पश्चिम महाराष्ट्रात दौरा करणार असून आमरण उपोषण आणि शांतता रॅलीत 17 दिवसाचे अंतर असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मंत्री शंभुराज देसाई यांनी विनंती केल्यानंतर जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला होता. मात्र, या एका महिन्यात कोणताही तोडगा निघाला नाही. ही मुदत 13 जुलैला संपली आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे आता पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. यासाठी फक्त एकच दिवसाचा कालावधी राहिला आहे. उद्यापासून त्यांचे आमरण उपोषण सुरु होणार आहे. आता सरकार यावर काय निर्णय घेणार हे पाहणं देखील महच्वाचं असणार आहे.  


महत्वाच्या बातम्या:


आमरण उपोषणाच्या 17 दिवसांनंतर मनोज जरांगे करणार पश्चिम महाराष्ट्र दौरा, 'जगलोच तर ॲब्यूलन्समध्ये जाईन पण....'