मुंबई: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले जात आहे. या वादात भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी उडी घेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला होता. मनोज जरांगे यांना DD म्हणजे देवेंद्र द्वेष नावाचा आजार झाल्याची टीका प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केली होती. गेल्या 60 वर्षांत जे होऊ शकलं नाही ते देवेंद्रजींनी केलं! मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले, जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) कोणाच्या छत्रछायेखालून हा द्वेष करत आहेत? हा संशोधनाचा विषय आहे, असे प्रसाद लाड यांनी म्हटले होते. प्रसाद लाड यांच्या या टीकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार आगपाखड केली होती. मनोज जरांगे यांनी शेलक्या भाषेत प्रसाद लाड यांचा समाचार घेतला होता. याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली होती. त्यानंतर शुक्रवारी प्रसाद लाड यांनी पुन्हा एकदा ट्विट करुन गेल्या 60 वर्षात काय झाले, याची चर्चा करण्याचे आव्हान जरांगे पाटील यांना दिले आहे.


प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले?


बाय द वे, मि. जरांगे,


मराठा समाजाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे, 'नरेटिव्ह'ची नाही! काल आपण मला शिविगाळ करताना जो आकांडतांडव केला आणि जे प्रमाणपत्र फडणवीसांच्या एसपीने नाकारले असे सांगितले, त्याची मूळ हकीकत जाणून घ्या.


हे प्रकरण ठाणे एसपींच्या हद्दीतील नाही, तर ठाणे पोलिस आयुक्तांच्या हद्दीतील आहे. सखाराम रामचंद्र ढाणे, जिंतूर, परभणी यांनी 2023-2024 चे नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. (6 जून 2024 च्या जाहिरातीनुसार) त्यांच्याकडे 2024-25 या वर्षाचे प्रमाणपत्र होते. त्यामुळे त्यांनी स्वत: एक प्रमाणपत्र भरून खुल्या प्रवर्गातून संधी देण्यात यावी, असे हमीपत्र दिले.


आमची तीच अपेक्षा आहे, तुम्ही योग्य माहिती घेत जा आणि मग बोलत जा. मी पुन्हा सांगतो, मराठा समाजासाठी मी कितीही शिवीगाळ ऐकायला तयार आहे. पण, मराठा समाजासाठी 60 वर्षांत कुणी काय केले आणि कुणी काय केले नाही, यावर एकदा खुली चर्चा होऊन जाऊ द्या!






मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांच्यावर काय टीका केली होती?


हा कोण बांडगुळ आता? माझ्या नादाला लागू नको, तू किती पैसेवाला आणि किती करप्ट आहे. तू जात विकून घर मोठं करणारी औलाद आहेस. मी तुला काय म्हटलंय का? तू देवेंद्र फडणवीस यांचं पाय चाट नाहीतर काही कर, आमच्या नादी लागू नकोस. तुम्ही मोठे लोक आमच्या जातीसाठी भूषण होता, आता तुम्ही नीच निघाला.


मराठ्यांच्या मुलांचं वाटोळं केल्याचा जाब प्रसाद लाड यांनी विचारावा असं म्हणत जरांगे म्हणाले की, ठाण्याच्या पोलिस भरतीत तिथल्या एसपीने कुणबी सर्टिफिकेट असलेल्या 400 ते 500 मुलांना बाहेर काढलं आणि ओपनमध्ये टाकलं. त्यावर प्रसाद लाडने देवेंद्र फडणवीसांना जाब विचारलं पाहिजे. ओपनमध्ये जा नाहीतर रिजेक्ट करतो अशी धमकी ठाण्याच्या एसपीने दिलीय. मग कशाला प्रमाणपत्र दिलंय? प्रमाणपत्र नसणाऱ्यांना आत घेताय. भंगार लोक आयएएस अधिकारी झालेत आणि प्रमाणपत्र असणाऱ्यांना बाहेर काढलं गेलं. तुला लई प्रेम असेल तर देवेंद्र फडणवीसांसोबत लग्न कर. माझ्या मुलांचं वाटोळं झालंय त्याचा जाब विचार. 


मुलींना शिक्षण मोफत जाहीर केलं, मग त्यात कशाला अटी घातल्या असा सवाल जरांगे यांनी विचारला. मोफत शिक्षणाची घोषणा केली तर ते विनाअट करा ना, त्यासाठी व्हॅलिडिटीची अट कशाला पाहिजे असं जरांगे म्हणाले.


आणखी वाचा


तू किती पैसेवाला आणि करप्ट, एवढं प्रेम असेल तर फडणवीसांसोबत लग्न कर; मनोज जरांगेंचं प्रसाद लाड यांना प्रत्युत्तर