Maharashtra Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Election 2024) सर्वच पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. तसेच, विधानसभेच्या दृष्टीकोनातून समीकरणांची जुळवाजुळव करण्यासाठी सध्या सर्वच पक्षांच्या बैठकांचं सत्र पाहायला मिळतं. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) अशी लढत पाहायला मिळेल, असं सांगितलं जात आहे. मात्र, आता राज्याच्या निवडणुकीत एकसंघ राजकीय आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षांची एकसंघ राजकीय आघाडी मैदानात उतरणार असल्याची माहिती मिळत आहे. 


रिपब्लिकन पक्षांमधील (Republican Party) आठवले, गवई, कवाडे गट आता एकसंध निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्ह आहेत. एकीकृत रिपब्लिकन समितीच्या वतीनं प्रयत्न सुरू झाले आहेत. चर्चेत भाजपसोबत असलेला आठवलेंचा पक्षही सहभागी झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे गट, तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आंबेडकरी विचारसरणीच्या विविध संघटनांची मोट बांधून एकसंघ रिपब्लिकन आघाडी तयार करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. एकीकृत रिपब्लिकन समितीच्या वतीनं हे प्रयत्न केले जात असल्याची माहिती मिळत आहे. नुकतंच नागपुरात त्या संदर्भातील एक प्राथमिक बैठक पार पडली.


भाजप, शिवसेनेला धक्का? 


विशेष म्हणजे, चर्चेच्या पातळीवर या एकसंघ रिपब्लिकन राजकीय आघाडी उभारण्याच्या प्रयत्नात सध्या भाजपसोबत असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे, तसेच शिंदेंच्या शिवसेनेसोबत असलेले जोगेंद्र कवाडे गटाचे प्रतिनिधीही सहभागी झाले आहे. त्यामुळे आठवले आणि कवाडे महायुतीतून बाहेर पडतील का? असा प्रश्न या घडामोडीमुळे निर्माण झाला आहे.


राज्यातील छोट्या छोट्या रिपब्लिकन पक्षांना तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आंबेडकरी विचारसरणीच्या संघटनांना राजकीय आघाडीच्या स्वरूपात एकत्रित आणण्यासाठी एकिकृत रिपब्लिकन समिती ने वेगवेगळ्या रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षांशी बोलणं करून नागपुरात बैठक बोलावली होती.


महायुती आणि महाविकास आघाडीसमोर नवं आव्हान 


बैठकीत आठवले, गवई, कवाडे या रिपब्लिकन पक्षाच्या सर्व प्रमुख गटांसह आंबेडकरी विचारसरणीच्या सामाजिक संघटना तसेच बौद्ध महासभेच्या प्रतिनिधींनी ही सहभाग नोंदवला आहे. सर्व छोट्या छोट्या रिपब्लिकन पक्षांची आणि समविचारी सामाजिक संघटनांची मोट बांधून एकसंघ रिपब्लिकन पक्ष उभारण्याचा अंतिम उद्दिष्ट या बैठकीत निश्चित करण्यात आलं आहे. सर्व रिपब्लिकन पक्षांचा एक पक्ष तयार होण्यास वेळ लागत असेल. तर तोवर रिपब्लिकन पक्षांची राजकीय आघाडी उभारावी आणि त्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणूक लढवावी, असा धोरणात्मक निर्णय ही त्या बैठकीत झाला आहे. 


दरम्यान, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीनंतर तिसऱ्या आघाडीचे प्रयत्न सुरू असताना आता रिपब्लिकन पक्षांची एकसंघ राजकीय आघाडी उभारण्याचेही प्रयत्न सुरू झाले आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी समोर रिपब्लिकन पक्षांची ही नवी राजकीय आघाडी नवं आव्हान उभं करू शकते.