Avinash Jadhav: हत्तीला वाटायचं लोक आपलीच आरती करतायत, पण ती 'राजाची' पुण्याई होती; वसंत मोरेंच्या राजीनाम्यानंतर अविनाश जाधवांची पोस्ट व्हायरल
Vasant More resign: मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी मंगळवारी पक्षसदस्यत्त्वाचा राजीनामा दिला होता. मनसेतील काही नेते आपल्याला काम करुन देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. वसंत मोरे पुण्यातील मनसेचा प्रमुख चेहरा होते.
ठाणे: राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील (मनसे) पुण्याचे नेते वसंत मोरे यांनी मंगळवारी सकाळी तडकाफडकी पक्षातून राजीनामा दिला होता. वसंत मोरे हे मनसेचा पुण्यातील प्रमुख चेहरा होते. त्यामुळे साहजिक त्यांनी राज ठाकरेंची (Raj Thackeray) साथ सोडल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरे (Vasant More) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका सविस्तरपणे मांडली होती. तसेच आपण आता मनसेत (MNS) परतण्याचे सर्व दोर स्वत:हून कापल्याचेही सांगितले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे यांचा कट्टर कार्यकर्ता आणि मनसेचे ठाणे-पालघर विभागाचे अध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अविनाश जाधव यांंनी थेट नाव घेतले नसले तरी त्यांनी अप्रत्यक्षपणे वसंत मोरे यांना कानपिचक्या दिल्याची चर्चा आहे. अविनाश जाधव यांची ही फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अविनाश जाधव यांनी फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?
'एक राजा रोज हत्तीवरून राज्यात फेरफटका मारायचा तेव्हा प्रत्येक चौकात राजाचं औक्षण केलं जायचं,आरती ओवाळली जायची,धुमधड्याक्यात स्वागत केलं जायचं. तेव्हा त्या हत्तीला वाटायचं औक्षण-आरती, आपलीच केली जात आहे.त्याला कळत नव्हतं ही राजाची पुण्याई आहे. राजामुळे त्याला हा मान मिळत आहे.', असे अविनाश जाधव यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. यामधील राजा म्हणजे राज ठाकरे आणि हत्ती म्हणजे वसंत मोरे, असे प्रथमदर्शनी तरी सूचित होत आहे. त्यामुळे वसंत मोरे यांना मिळत असलेली प्रसिद्धी आणि मानपान हा राज ठाकरे यांचा वरदहस्त असल्यामुळेच होता, असे अविनाश जाधव यांनी अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
वसंत मोरेंच्या राजीनाम्यानंतर पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांचे राजीनामे पडणार?
वसंत मोरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत मनसेच्या पुणे कार्यकारिणीतील नेत्यांबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. या नेत्यांनी पुणे लोकसभेबाबत राज ठाकरे यांना चुकीचा अहवाल दिला. मी याची तक्रार राज ठाकरे यांच्याकडे केली. पण त्याची दखल घेण्यात आली नाही. मी या आधी एकनिष्ठतेचा कळस केला, आता राजीनामा देऊन परतीचे दोर स्वतः कापले आहेत, असे वसंत मोरे यांनी सांगितले. तसेच मी राजीनामा दिल्यानंतर पुण्यातील मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडे फेसबुक आणि व्हॉटसअॅपवरुन राजीनामे पाठवून दिल्याचेही वसंत मोरे यांनी सांगितले. मी कोणालाही पक्ष सोडायला सांगितलेला नाही. मात्र, यापुढेही त्यांना पक्ष सोडायचा असेल तर तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल, असे वसंत मोरे यांनी सांगितले होते.
आणखी वाचा
राज ठाकरेंची पुण्यातील ताकद, मनसेचे फायरब्रँड नेते, पक्षाला 'जय महाराष्ट्र', कोण आहेत वसंत मोरे?