(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray Meets CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी राज ठाकरे 'वर्षा' बंगल्यावर
Raj Thackeray Meets CM Eknath Shinde : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली.
Raj Thackeray Meets CM Eknath Shinde : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज (15 ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली. आरोग्य विषयावर चर्चा करण्यासाठी या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत तसंच महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभाच लोढा हे देखील उपस्थित होते. या भेटीचा फोटो देखील समोर आला आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता
साडेतीनच्या सुमारास राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले. राज ठाकरे अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचल्याने राजकीय वर्तुळातील सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आरोग्यविषयक मुद्दे हे भेटीचं प्रमुख कारण असलं तरी यात राजकीय चर्चा होणार नाही, असं होऊ शकणार नाही. आरोग्यविषयक चर्चेसोबतच पुढील महिन्यात होणाऱ्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीबाबतही राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. या पोटनिवडणुकीत मनसे भाजप आणि शिंदे गटाच्या युतीला पाठिंबा देणार का याकडे लक्ष असणार आहे.
भेटीत काय होणार, उत्सुकता कायम!
वर्षा बंगल्यावरील या भेटीला एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांच्यासोबतच भाजपचे नेते मंगलप्रभात लोढा देखील उपस्थित आहेत. त्यामुळे त्यांच्यात राजकीय चर्चा होणार हे साहजिक आहेत. शिवसेनेत पडलेली मोठी फूट, त्यामुळे राज्यात झालेले संत्तांतर, आगामी काळात होऊ घातलेली मुंबई महापालिका निवडणूक आणि सध्या सुरु असलेली अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी याबाबत या बैठकीत विशेष चर्चा होईल असा तर्क आहे. आता आगामी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीबाबत त्यांच्यात चर्चा होते का, चर्चा झालीच तर त्याचा तपशील काय याची उत्सुकता लागली आहे.
दोन महिन्यातली ठाकरे आणि शिंदे यांची तिसरी भेट
गेल्या दोन महिन्यात राज ठाकरे यांनी तीन वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे याआधी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्याच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आले होते. तर त्याआधी एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती.
VIDEO : Raj Thackeray Meets Eknath Shinde : राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला : ABP Majha