मावळ लोकसभेवर भाजपचा दावा, महायुतीचा उमेदवार कमळावर उभा करण्याची मागणी!
Maval Lok Sabha constituency : राज्यातील सत्ता संघर्षानंतर लोकसभा निवडणुकांची (loksabha election 2024) परिस्थिती बदललीये. मावळ लोकसभेतही (Maval Lok Sabha constituency) याचे पडसाद जाणवतायेत.
Maval Lok Sabha constituency : राज्यातील सत्ता संघर्षानंतर लोकसभा निवडणुकांची (loksabha election 2024) परिस्थिती बदललीये. मावळ लोकसभेतही (Maval Lok Sabha constituency) याचे पडसाद जाणवतायेत. महायुतीचे उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणेचं असतील हे जवळपास निश्चित मानलं जातं होतं. पण आता मावळ लोकसभा मतदारसंघावर महायुतीमध्ये भाजपने दावा केल्याचं समोर आले आहे. महायुतीचा उमेदवार कमळावर उभा करा, अशी मागणी स्थानिक भाजप नेत्यांनी केली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे श्रीरंग बारणे भाजपचे उमेदवार असतील? अशी चर्चा सुरु झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाट्याला असणाऱ्या मावळ लोकसभेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता भाजपनेही दावा केलाय. लोणावळ्यात सहा विधानसभांमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आणि कर्जतमध्ये गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील सूर असाच होता. मावळ लोकसभेत भाजपचे तीन आमदार, दोन महापालिका तसेच अनेक नगरपरिषद आणि ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता आहे. त्या तुलनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची ताकद अतिशय कमकुवत असल्याचा लेखाजोखा मांडत, भाजपने मावळवर हक्क दाखवला आहे. महायुतीचा उमेदवार कमळाच्या चिन्हावर लढायला हवा, मग अगदी उमेदवार शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे असले तरी हरकत नाही. अशी आग्रही भूमिका भाजपने घेतली आहे. मावळ लोकसभेतील भाजपचे संयोजक सदाशिव खाडे आणि पिंपरी चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांशी संवाद नाजिम मुल्ला यांनी साधला आहे.
कमळावर लढणारा उमेदवार असावा -
सदाशिव खाडे म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये सहापैकी तीन आमदार भाजपचे आहेत. पिंपरी चिंचवड आणि पनवेल महानगरपालिकाही भाजपच्या ताब्यात आहेत. शेकडो ग्रामपंचायतीमध्येही भाजप आहे. त्यामुळे सर्वसामान्य भाजप कार्यकर्त्यांना आपला उमेदवार असावा अशी भावना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना कमळावर मत द्यायचं आहे. त्यामध्ये येथील महायुतीचा उमेदवार कमळाच्या तिकिटावर लढणारा असावा.
दोन जिल्ह्यात मतदारसंघ
मावळ मतदार संघाची भौगोलिक परिस्थिती ही तशी विचित्रच आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ या तीन विधानसभा मतदार संघासह रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत आणि उरण या तीन विधानसभा मतदार संघांनी बनलेला हा मतदार संघ. पिंपरी, चिंचवड हा भाग औद्योगिक तर मावळ इंद्रायणी भात आणि गुलाब शेती साठी प्रसिद्ध. तळ कोकणात असलेले कर्जत उरण आणि पनवेल हे कोकण समुद्र पट्ट्यांमध्ये वसलेला भाग. या मतदार संघातील मतदार हा 60 टक्के ग्रामीण तर 40 टक्के शहरी आणि निमशहरी भागात राहतो. कर्जत, उरण भागात आदिवासी समाजाचं प्रमाणही लक्षणीय आहे.