Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात, सामूहिक आमरण उपोषणाच्या तारखेची घोषणा, नव्या सरकारला आवाहन
Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उद्या (17 डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन सामूहिक आमरण उपोषणाच्या तारखेची घोषणा करणार आहेत
जालना : नागपूरच्या राजभवन येथे काल (15 डिसेंबर) मंत्र्यांचा शपथविधी सोहळा (Mahayuti Oath Ceremony) पार पडला. त्यानंतर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे उद्या (17 डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन सामूहिक आमरण उपोषणाच्या तारखेची घोषणा करणार असल्याचं सांगितलंय, ज्यांना स्वतः च्या मनाने सामूहिक आमरण उपोषणाला बसायचं, त्यांनाच उपोषणाला बसवलं जाईल, असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. उपोषणाला बसण्यासाठी कोणावरही बंधन घातलं जाणार नसून सामूहिक आमरण उपोषणाला कोणी नाही जरी बसलं, तरी मी बसणार असल्याचेही जरांगे यांनी म्हटलंय.
मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याचे आम्हाला देणं घेणं नाही- मनोज जरांगे
दरम्यान, छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही? हा आमचा प्रश्न नसून मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्याचे आम्हाला देणं घेणं नसल्याचं सांगत जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर अधिक बोलणं टाळलंय. सरकारने या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढावा, असं आवाहन करत सरकार या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढेल अशी अपेक्षा जरांगेंनी व्यक्त केलीय. देवेंद्र फडणवीस यांनी बोलल्याप्रमाणे मराठा आरक्षण दिलं पाहिजे. अशी मागणी देखील जरांगे यांनी केलीय.
5 जानेवारीपर्यंतचा सरकारला अल्टिमेटम
मराठा आरक्षणाच्या मुद्यांवर बोलतांना या पूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी 5 जानेवारीपर्यंतचा सरकारला अल्टिमेटम दिला होता. तर सरकार स्थापन झाल्याबद्दल महायुती सरकारला शुभेच्छा ही दिल्या होत्या. आता मात्र जनतेचे प्रश्न मार्गी काढणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. सरकारने 5 जानेवारीपर्यंत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात, नाही तर मराठे पुन्हा आंदोलनात उभं राहून सरकारला परेशान करणार आहेत. मराठा आणि कुणबी एक आहे हा विषय मार्गी काढायचा. 2004 च्या अध्यादेशात दुरुस्ती करायची, यांसह सात-ते आठ मागण्या आम्ही याआधीच सरकारकडे केलेल्या आहेत. त्यांनी त्या पूर्ण मार्गी काढाव्यात. नाहीतर सरकारला पुन्हा एकदा मराठ्यांना सामोरे जावे लागेल हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. तसेच, आता गुर्मीत आणि मस्तीत जगायचे नाही. जनतेने कौला दिलाय म्हणून नाटकं करायचे नाहीत. समाजाला सांभाळायला शिका, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या