Manipur Assembly Election 2022: मणिपूरमध्ये आज दुसऱ्या टप्प्यात 22 विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे. यादरम्यान करोंग विधानसभा मतदारसंघात मतदानादरम्यान हिंसाचार झाल्याची घटना घडली आहे. या हिंसाचारात सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. यावेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील लामफेल भागात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) निलंबित नेते सी बिजॉय यांच्या घरावर देशी बनावटीचा बॉम्ब फेकला आहे. मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.
राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू होण्याच्या काही तास आधी शुक्रवारी रात्री ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दोन दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी घडवून आणलेल्या स्फोटात कोणीही जखमी झाले नाही.
सहा वर्षांसाठी सी बिजॉय यांना भाजपने केले निलंबित
गेल्या महिन्यात भाजपने शिस्तभंगाची कारवाई करत सी बिजॉय यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली होती. बिजॉय यांनी पत्रकारांना सांगितले की, हा हल्ला बहुधा मला राजकीयदृष्ट्या शांत करण्याचा इशारा आहे. मात्र, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
यावेळी त्रिशंकू परिस्थिती होऊ शकते निर्माण
दरम्यान, मणिपूरमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज 10 जिल्ह्यांतील 22 जागांवर मतदान होत आहे. या मतदानात 92 उमेदवारांसाठी मतदान होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 11 वाजेपर्यंत 28.20 टक्के मतदान झाले आहे. जे 2017 च्या तुलनेत 16.80 टक्के कमी आहे. राज्याच्या बाह्य सर्किटमधील जिल्हे हे नागा पीपल्स फ्रंट (NPF) आणि काँग्रेसचे बालेकिल्ले राहिले आहेत. त्यामुळेच यावेळी हे पक्ष सत्ताधारी भाजपला येथून आवाहन देऊ शकणार का? हे पाहावं लागेल.
एकूण 12 लाख मतदार
मणिपूरमध्ये एकूण 12 लाख 9 हजार 429 मतदार असून, त्यात 6 लाख 28 हजार 657 महिला आणि 175 ट्रान्सजेंडर आहेत. मणिपूरमध्ये 28 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला. यामध्ये 38 जागांवर मतदान झाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Manipur Election : मणिपूरमध्ये आज मतदानाचा दुसरा टप्पा, 22 जागांसाठी 92 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Russia Ukraine War : मोदीजी आम्हाला वाचवा नाहीतर आमचा जीव जाईल, युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची आर्त विनवणी
- Russia-Ukraine War : भारतीय विद्यार्थ्याने युक्रेन सोडण्यासाठी घातली अट, मग 'असा' पोहोचला भारतात!