Manipur Assembly Election 2022 : देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. यामध्ये गोवा, उत्तराखंड आणि पंजाब  या तीन राज्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तर उत्तर प्रदेशमधील सहा टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असून, अद्याप एक टप्पा बाकी आहे. तर मणिपूर विधानसभेचा देखील एक टप्पा पार पडला असून, आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या दुसऱ्या टप्प्यात 22 जागांसाठी मतदान होत असून, 92 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे.
  
दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार असलेल्या जागांपैकी डोंगराळ प्रदेशातील विधानसभेच्या 11 जागा आहेत. जिथे नागा जमातींचे प्राबल्य आहे. या जागांवर निकराची लढत अपेक्षीत आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात 5 विधानसभा जागांच्या 5 मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. ही मतदान केंद्रे कुंद्रकपम, सैतू, थॅनलॉन, हेंगेलप आणि चुराचंदपूर विधानसभा मतदारसंघात आहेत. या निवडणुकीत मणिपूर नागा हिल महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.


 





28 फेब्रुवारीला पार पडला पहिला टप्पा 


मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यात 28 फेब्रुवारीला मतदान झाले होते. राज्यातील एकूण 60 जागांपैकी 38 जागांवर मतदान झाले होते. इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व, बिष्णुपूर, कांगपोकपी आणि चुराचंदपूर यांचा समावेश होता. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात 78.09 टक्के मतदान झाले होते.



निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात 9 लाख 85 हजार 119 पुरुष आणि 10 लाख 49 हजार 639 महिला मतदार आहेत. त्याच वेळी, ट्रान्सजेंडर मतदारांची संख्या 208 आहे. त्यापैकी दिव्यांग मतदारांची संख्या 14 हजार 565 आहे, तर 80 वर्षांवरील मतदारांची संख्या 41 हजार 867 इतकी आहे. 


मतदानापूर्वी काँग्रेसचा भाजपवर आरोप


दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. काँग्रेसने भाजपवर आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी बंदी घातलेल्या दहशतवादी गटाला 17 कोटी रुपये देण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री जयराम रमेश यांनी ट्विट केले. यामध्ये त्यांनी 'केंद्रीय गृह मंत्रालय आणि भाजप राज्य सरकारने मणिपूरमधील आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे.