Russia Ukraine Conflict : युक्रेन-रशियामध्ये (Ukraine-Russia War) युद्ध सुरू आहे, युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. युक्रेनच्या सुमी शहरात तब्बल 900 भारतीय विद्यार्थी अडकून पडलेत. या शहरात दर तासाला रशियाकडून बॉम्बहल्ले होत असल्यानं विद्यार्थी धास्तावले आहेत. या विद्यार्थ्यांना अन्न तर सोडाच, पण साधं पाणीही प्यायला नसल्यानं रस्त्यावर पडलेला बर्फ वितळवून पाणी पिण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यामुळं हे विद्यार्थी अक्षरशः रडकुंडीला आले असून मोदीजी आम्हाला वाचवा, अन्यथा आमचा जीव जाईल, अशी आर्त विनवणी युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी केली आहे.
सुमी हे शहर युक्रेनच्या उत्तर पूर्व भागात असून रशियाच्या बॉर्डरपासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर आहे. या शहरातील युनिव्हर्सिटीत शिकण्यासाठी गेलेले तब्बल 900 भारतीय विद्यार्थी रशिया युक्रेन युद्धामुळे अडकून पडले आहेत. सुमी शहरात सध्या दर तासाला बॉम्ब हल्ले होत असून त्यामुळं विदयार्थी राहत असलेल्या हॉस्टेलमध्ये वीज, अन्न, पाणी याचा पुरवठा बंद झाला आहे. या सगळ्याबाबत तेथील एका भारतीय विद्यार्थ्यानं व्हिडीओ तयार करून पाठवला असून त्यात हे विद्यार्थी अक्षरशः रडकुंडीला आल्याचं पाहायला मिळतंय.
युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी म्हणाले, आम्ही 900 विद्यार्थी येथे अडकलो असून आम्हाला बाहेर पडण्याचीही सोय नाही. प्रत्येक ठिकाणी स्नायपर्स तैनात असून यापूर्वी बाहेर पडलेल्या काही परदेशी विद्यार्थ्यांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत. आम्हाला खायला प्यायला काहीच उरलेलं नाही. आम्ही काल दुपारी शेवटचं जेवलो, दुपारचंच उरलेलं थोडंसं अन्न रात्रीही खाल्लं, पण आता आमच्याकडे खायला काहीच नाही, त्यामुळं आम्ही उपाशी आहोत. प्यायला, सुद्धा पाणी नाहीये, त्यामुळं अक्षरशः रस्त्यावर पडलेला बर्फ जमा करून तो वितळवून पाणी पिण्याची वेळ आमच्यावर आली आहे. त्यामुळं मोदीजी आम्हाला वाचवा, नाहीतर आमचा जीव जाईल, अशी विनवणी हे विद्यार्थ्यांनी दिली आहे.
सुमी शहरापासून रशियाची बॉर्डर ही अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर आहे. मात्र भारताचं रेस्क्यू ऑपरेशन हंगेरी, रोमानिया या बाजूनं सुरू असून तिथं आम्ही जाऊच शकत नाही, कारण तिथे जायला किमान 12 तासांचा प्रवास करावा लागणार असून त्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याचं हे विद्यार्थी सांगत आहेत. त्यामुळं सुमी शहरात अडकलेल्या या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकारनं युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
संबंधित बातम्या :
Russia-Ukraine War : भारतीय विद्यार्थ्याने युक्रेन सोडण्यासाठी घातली अट, मग 'असा' पोहोचला भारतात!