Election Commission Raj Thackeray: मविआ-मनसे नेत्यांचं शिष्टमंडळ मंत्रालयात दाखल; राज उद्धव-आदित्य एका गाडीतून आले, भेटीकडे सर्वांचं लक्ष
Maharashtra Politics: निष्पक्ष निवडणुकांसाठी मविआ नेत्यांबरोबर आज राज ठाकरे देखील निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.

मुंबई: सर्व पक्षीय नेते आज निवडणूक अधिकारी यांची भेट घेणार आहेत. या भेटीसाठी अनेक पक्षाचे नेते एकत्र आले आहेत. महाविकास आघाडीसह (mahavikas aghadi) मनसे (MNS) आणि इतर पक्ष ही आज एकत्र असतील.पण पत्रक देऊनही या भेटीसाठी सत्ताधारी पक्षाचे कोणतेही नेते आणि पक्ष येणार नाही. नेत्यांचं शिष्टमंडळ मंत्रालयात दाखल झाले आहेत.
Election Commission Raj Thackeray: राज ठाकरे यांची उपस्थिती राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण
सध्याच्या निवडणूक प्रक्रियेबाबत निर्माण झालेल्या शंकांवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज (मंगळवार) राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आदी नेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत राज ठाकरे यांची उपस्थिती राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जात आहे. दरम्यान, सर्वपक्षीय शिष्टमंडळात सहभागी होण्यावरून काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. मनसेसोबत जाण्याला विरोध करत काही नेत्यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली असून, मनसेबरोबर जाणे योग्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.
Election Commission Raj Thackeray: निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास दृढ व्हावा
सर्वपक्षीय शिष्टमंडळात सहभागी होण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आमंत्रित केले आहे. लोकशाही अधिक बळकट व्हावी आणि निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास दृढ व्हावा, हा या भेटीचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसून, आपण सहभागी झाल्यास सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रतिष्ठा अधिक वाढेल, असे राऊत यांनी फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायतींच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील. या निवडणुकांच्या यंत्रणा आणि प्रक्रियेवर कोणताही संशय राहू नये, निवडणुका निष्पक्षपातीपणे, पारदर्शक व संविधानाचे पूर्ण पालन व्हावे ही राजकीय पक्षांची भूमिका आहे, असे खासदार राऊत यांनी सांगितले होते. निवडणूक प्रक्रियेतील विविध मुद्द्यांवर चर्चा करून आयोगाचे लक्ष वेधण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांची भेट घेणार आहे.
Election Commission Raj Thackeray: हरकती, सूचनांसाठी दिली मुदतवाढ
नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवरील हरकती आणि सूचनांसाठीची मुदत निवडणूक आयोगाने वाढवली आहे. आता नागरिकांना१७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. यावर आलेल्या हरकती आणि सूचनांचा विचार करून यादीत आवश्यक सुधारणा केल्यानंतर अंतिम मतदार यादी ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर केली जाणार आहे. याआधी ही तारीख २८ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली होती.
Election Commission Raj Thackeray: अनेक वर्षांनंतर शरद पवार मंत्रालयात
राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार मंत्रालयात फार क्वचितच येतात. मंत्रालयाला आग लागल्यानंतर त्यांनी शेवटचा दौरा केला होता. त्यामुळे पवार हे अनेक वर्षांनी पुन्हा मंत्रालयात येणार आहेत.
Election Commission" शिष्टमंडळात नेमके कोण कोण असणार?
शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अध्यक्ष
उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना ठाकरे गट
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष - अनुपस्थित आहेत
जयंत पाटील, शेकाप
अजित नवले, माकप
रईस शेख, स पा
सुभाष लांडे, भारतीय कम्युनिस्ट पक्ष
बाळासाहेब थोरात, काँग्रेस
वर्षा गायकवाड, काँग्रेस
संजय राऊत शिवसेना ठाकरे गट
Election Commission Raj Thackeray: सत्ताधारी पक्षाचे कोणतेही नेते आणि पक्ष येणार नाही
पत्रक देऊनही या भेटीसाठी सत्ताधारी पक्षाचे कोणतेही नेते आणि पक्ष येणार नाही. यावरच आता संदीप देशपांडे यांनी सोशल एक्स पोस्ट केली आहे. निवडणुका पारदर्शी पणे होणं ही जबाबदारी निवडणूक आयोग,विरोधी पक्ष याच बरोबर सत्ताधारी पक्षांची सुद्धा आहे. पोस्ट करत देशपांडे यांनी सत्ताधारी पक्षाला टोला लगावला आहे, याबाबत माध्यमांशी बोलताना देखील संदीप देशपांडे म्हणाले, निवडणुका पारदर्शीपणे झाल्या पाहिजे ही जबादारी प्रत्येकाची आहे.लोकशाही जपण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. बऱ्याच मतदार याद्यात घोळ आहे म्हणून ही जबाबदारी फक्त आमची आहे का ? जोगेश्वरीच्या मतदार यादीत कुठल्या तरी भाषेत नाव लिहिली आहेत कुठली भाषा आहे. आम्ही सत्ताधारी पक्षाला निमंत्रण दिले आहे. जर ते येत नसतील तर त्यांची इच्छा नाही निवडणुका पारदर्शीपणे व्हाव्या असे वाटत नाही, असंही देशपांडे पुढे म्हणालेत.
Election Commission Raj Thackeray: तुमची “मती” चोरीला गेली हे सिद्ध होईल! - नवनाथ बन
या शिष्टमंडळाच्या भेटीवर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी हल्लाबोल केला आहे, त्यांनी काही प्रश्न उपस्थित करत उत्तर देण्याचं आवाहनही केलं आहे.
महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे. पण त्याआधी त्यांनी या पाच प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यावीत.
1.लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला कमी जागा मिळाल्या, तेव्हा भाजपनं जनतेचा निर्णय मान्य केला पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर अचानक “मतचोरी” का आठवली?
2.मविआ जिंकली तर ईव्हीएम बरोबर, भाजप जिंकली तर ईव्हीएमवर शंका हा ढोंगीपणा लोकशाहीसाठी योग्य आहे का?
3.जर निवडणूक प्रक्रियेवर एवढीच शंका आहे, तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे खासदार आणि आमदार तत्काळ राजीनामा देणार आहेत का?
4. लोकशाहीच्या नावानं गळा काढणारी मविआ लोकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी काही करणार की फक्त नौटंकी करणार ?
5.जनतेच्या निर्णयावर शंका घेऊन महाविकास आघाडी महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान का करते?
महाविकास आघाडीतील नेत्यांकडे या प्रश्नांची उत्तरं आहेत का? नसतील तर “मतचोरी” नाही तर तुमची “मती” चोरीला गेली हे सिद्ध होईल!
























