Maharashtra Politics : सुधाकर बडगुजर, कुणाल पाटलांनंतर उत्तर महाराष्ट्रात मविआला मोठं खिंडार पडणार? भाजप नेत्याच्या दाव्याने भुवया उंचावल्या
Maharashtra Politics : सुधाकर बडगुजर आणि कुणाल पाटील यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केल्याने महाविकास आघाडीसाठी हा मोठा मानला जात आहे.

Maharashtra Politics : उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) राजकीय भूकंप होण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. उत्तर महाराष्ट्र लवकरच काँग्रेसमुक्त (Congress) होणार असून, महाविकास आघाडीतील अनेक बडे नेते भाजपाच्या संपर्कात आहेत आणि लवकरच ते पक्षप्रवेश करणार आहेत, असा मोठा दावा भाजपाचे राज्य महामंत्री विजय चौधरी (Vijay Chaudhari) यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
धुळे येथील काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) आणि नाशिक येथील शिवसेना ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी अलीकडेच भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. या दोन्ही नेत्यांच्या पक्षांतराचा थेट परिणाम महाविकास आघाडीवर झाला आहे. कुणाल पाटील आणि सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाने महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) मोठी पोकळी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
महाविकास आघाडीला मोठं खिंडार पडणार : विजय चौधरी
विजय चौधरी यांनी म्हटलं आहे की, "महाविकास आघाडीतील अनेक नेते आपापल्या पक्षात नाराज आहेत तर दुसरीकडे भाजपाचे काम उत्तम दर्जाच्या असल्याने उत्तर महाराष्ट्रातील मोठे नेते आता भाजपात येण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठं खिंडार पडणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला याचा फायदा होईल, असे त्यांनी म्हटले. विजय चौधरींच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून आगामी काळात कोणकोणते नेते भाजपात प्रवेश करतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
उद्धव ठाकरे नाशिक दौरा करणार
दरम्यान, मागील काही दिवसांमध्ये नाशिकच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी घडल्या आहेत. नाराजी, पक्षातून हकालपट्टी, आणि पक्षांतर यासारख्या घडामोडींमुळे संपूर्ण नाशिक जिल्हा राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही नगरसेवकांनी आपापल्या पक्षांवर नाराजी व्यक्त करत पक्षांतर केले आहे. या राजकीय उलथापालथीत शिवसेना ठाकरे गटाला सर्वाधिक धक्का बसला आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी गेल्या काही दिवसांमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठी मुसंडी मारली असून, ठाकरे गटाच्या संघटनेला खिळखिळं करण्याचं काम केलं आहे. परिणामी, आता ठाकरे गटाने संघटन बळकट करण्यासाठी ॲक्शन मोडमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटामध्ये लवकरच संघटनात्मक बदल करण्यात येणार असून, पक्षाच्या कार्यकारिणीची नव्याने फेररचना केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत. जुलै अखेरीस होणाऱ्या दोन दिवसीय दौऱ्यात ते नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा क्षेत्रांतील पक्षाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेणार आहेत.
आणखी वाचा
Shambhuraj Desai: "मुंबईत मराठी माणसाला घर नाकारलं तर..."; मंत्री शंभुराज देसाई यांनी दिला इशारा



















